नगर । प्रतिनिधी - नगर-दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी-काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे तीन-तीन वेळा या जागेसंदर्भात चर्चा करण्याची काहीच गरज नाही. मुळात सर्व जागांचा तिढा सुटलेला आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे एकत्र जागेची घोषणा करतील. नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असून कोणीही अपक्ष उभा राहणार नसून आघाडीचा एकच उमेदवार दिसेल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशनजळील असणार्या राष्ट्रवादी भवनात आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री मधुकर पिचड, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा कालपासून नगरमध्ये आली असून नगरमध्ये कर्जत-जामखेड व पारनेरसारख्या ठिकाणी मोठ-मोठ्या सभा झाल्या आहेत. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद नगर जिल्ह्यात मिळाला आहे. या सरकारने राज्यात व देशात जनतेला वेड्यात काढले आहे. शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान या सरकारने केलेले दिसून येते. शेती व पाण्यावर शून्य नियोजन आहे. आमच्या काळात पाण्याचा विभाग माझ्याकडे होता. अतिशय सक्षमपणे पाणीवाटपाचा काम आम्ही केले. या जिल्ह्यात मोठ-मोठी धरणे असून दुष्काळात पाणीवाटपाचा विषय यांना मार्गी लावता आला नाही. जनतेला आंदोलने करावी लागत आहेत. उसाच्या दरावरून अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतो आहे. योग्य हमीभाव उसाला मिळत नसून योग्य तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शेतकर्यांना कर्जमाफी केली, ती फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात शेतकर्यांच्या खात्यावर पैसा दिसत नाही. या देशात बँकांमध्येच घोटाळा होतो आहे. सरकारश संलग्न असणार्या बँकांमधूनच भ्रष्टाचार होताना दिसतो आहे. यामध्ये एसबीआय बँक सुध्दा सुटलेली नाही. शेतकर्यांच्या पिकाला या साडेचार वर्षात हमीभाव मिळाला नसल्याने शेतकरी नाराज असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. यासह अनेक विषय या सरकारच्या काळात आ वासून उभे आहेत. परंतु यांना सोडविता येत नाहीत. या सर्व विषयांवर राज्यभर आमच्या पक्षाने परिर्वतन यात्रा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढली आहे. त्यामुळे नक्कीच परिवर्तन होणार असून जनता आता आमच्या पाठीशी खंबीर उभी राहिलेली आहे. या परिवर्तन यात्रेत राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment