Thursday, 7 February 2019

प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी बनून ज्ञान मिळवा ः पवन नाईक


नगर । प्रतिनिधी - रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती नेहमीच बाल कलावंतांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविते. जिल्ह्यातील बाल कलावंतांसाठी एक स्वतंत्र असे व्यासपीठ निर्माण करून देणारी ही सामाजिक संस्था आहे. बाल संगीत महोत्सवाचे हे 20 वे वर्ष आहे. सांगीतिक स्पर्धा क्षेत्रातील हा उच्चांकच म्हणावा लागेल व यापुढेही या स्पर्धेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील यात शंकाच नाही. प्रत्येक क्षेत्रात मनापासून विद्यार्थी म्हणून राहिले तरच यशश्री चालून येते, असे प्रतिपादन प्रसिध्द गायक पवन नाईक यांनी केले. 
रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीने आयोजित केलेल्या बाल संगीत महोत्सव स्पर्धा पारितोषिक व आंतरभारती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शोभाताई ढेपे होत्या. सुगम गायन, शास्त्रीय गायन, तबला वादन, स्वरवाद्य वादन व देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत वय 5 ते 16 या गटातील एकूण 170 बाल कलावंत सहभागी झाले होते .
पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी संस्थेचे स्मारक समितीचे सहसचिव सुहास अंतरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्तविकात संस्थेचे विश्वस्त विजय सावंत यांनी संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सौ. ढेपे,  स्मारक समितीचे सचिव गणेश गावडे यांनी विचार मांडले.
महोत्सवात नृत्य दिग्दर्शिका प्रिया ओगले-जोशी, वर्षा पंडित, अभिजित शिर्के, नंदिनी स्वामी, आकाश असमर व सिध्देश मेहेत्रे यांनी कोरोग्राफ केलेले विविध प्रांतातील संस्कृती दाखविणारे नृत्य सादर करण्यात आले. सर्व सहभागी 192 नृत्य कलाकारांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी विश्वस्त अ‍ॅड. रवींद्र शितोळे, दत्तात्रय जंगम, राष्ट्र सेवा दलाचे संघटक गोविंद आडम, बापू जोशी, दिलीप जाधव तसेच परीक्षक गोपीनाथ वर्पे, प्रकाश शिंदे, नीता प्रथमशेट्टी, स्मिता राणा, वर्षा पंडित, ज्योती कुलकर्णी, सुशील क्षत्रिय, प्रसाद सुवर्णपाठकी आदी उपस्थित होते. 
बाल संगीत महोत्सवातील विजेत्यांना अनुक्रमे रू.1000, रु.700, रु.500 व उत्तेजनार्थ रु. 150 रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वरसंग्राम राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कु. समृध्दी राऊत हिचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक विजेत्यांनी आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण केले. त्याला उपस्थितांची दाद मिळाली. स्पर्धा प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment