Thursday, 7 February 2019

शिवसेनेच्या पाठपुराव्यामूळे 90 लाखांची पाणी योजना मंजूर


नगर । प्रतिनिधी - शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील बारा वाड्या-वस्त्यांसाठी 90 लाखांची जल पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या भागतील पाच हजार नागरिकांना मुळा धरणाचे गोड पाणी पिण्यास मिळणार आहे. या परिसरातील तब्बल दहा हजार लोकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. मंत्री विजय शिवतारे, बबनराव लोणीकर यांच्याकडे या योजनेचा पाठपुरावा करून योजना मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व घनश्याम शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 
रुईछत्तिशी (तालुका.नगर) येथील वाड्या-वस्त्यांवर कुठल्याही प्रकारे पाण्याचा स्त्रोत नव्हता. येथील नागरिकांना पिण्यासाठी विहीर, बोअरच्या खार्‍या पाण्यावर तहान भगवावी लागत होती. तसेच गावापासून या वस्त्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी गावात यावे लागत होते. या गावांमध्ये बुर्‍हाणनगर पाणी योजना आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांवर कुठल्या प्रकारचा पाण्याचा स्त्रोत नव्हता. या वाड्या-वस्त्यांवर पाणी आले पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गोरे व माणिक मोरे यांनी या बाबत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, मंत्री विजय बापू शिवतारे यांच्याकडे पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केली. त्यांनी प्रस्ताव पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सादर केला. लोणीकर यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली व 90 लाखांची जलवाहिनी मंजूर केली. यामुळे या भागातील वाड्या-वस्त्यांना आता बुर्‍हाणनगर योजनेअंतर्गत मुळा धरणाचे पाणी पिण्यास मिळणार आहे. या वाड्या-वस्त्यांवर जाणारे पाणी बहिरवाडी, पटारवस्ती, पवारवस्ती, भुजबळवस्ती, जमीनवस्ती, चौक वस्ती, कॉलवाटवस्ती, बांगडीवस्ती, माळीमळा, पाडळकर मळा यांना या योजनेचा लाभ होणार आहे. 
तसेच या परिसरात चार महाविद्यालय आहेत. या वस्त्यांवरील तसेच विद्यालयातील दहा हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शिवसेनेने पाठपुरावा केल्यामुळे बारा वाड्या-वस्त्यांवरील पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे 
रुईछत्तिशी येथील ग्रामंचायतच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, घनश्याम शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत, श्रीकांत जगदाळे, प्रवीण गोरे, सोमनाथ गोरे, सोमनाथ कुठे, श्रीकांत गोरे, सोमनाथ नामदेव गोरे, रावसाहेब गोरे, देवीदास मोरे, राजू भगत, माणिक मोरे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment