Tuesday, 5 February 2019

तरूणांना स्पर्धात्मक परीक्षांकडे वळवा


नगर । प्रतिनिधी - ‘देशाच्या प्रगतीत प्रशासकीय अधिकार्‍यांचेही योगदान असल्याने युवापिढीने प्रशासकीय सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तरुणांना स्पर्धात्मक परीक्षांकडे वळवणे व त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे देशहिताचे कार्य आहे,’ असे प्रतिपादन भारतीय नौदलातील निवृत्त व्हॉइस अ‍ॅडमिरल निज्जाम नदाक यांनी येथे केले.
नगरमधील मिराकी ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने येथील चांद सुलताना विद्यालयात केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांबाबत आयोजित परिसंवादात नदाक बोलत होते. निवृत्त जिल्हा प्रधान न्यायाधीश जमील शेख, माजी उपाध्यक्ष सुहेल शेख, आयटी कंपनीचे संचालक जलिल टाकीदार आदी उपस्थित होते. पुण्याच्या नॉलेज पार्क चॅरिटेबल ट्रस्ट व मिनर्व्हा इन्फ्रा यांच्यावतीने हा परिसंवाद झाला. अल्पसंख्याक मुस्लिम तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
नदाक यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासमवेत काम केले आहे. त्याचे अनुभवकथन त्यांनी केले. ‘तरुण पिढीने स्पर्धा परीक्षांतून प्रशासकीय सेवेत येणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच असून, यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचे मिराकी ऑर्गनायझेशनचे काम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या परिसंवाद उपक्रमासाठी मुश्ताक कुरेशी, रफीक मुन्शी, फारुक बागवान, सादिक तांबोळी, डॉ. रिजवान शेख, डॉ. इम्रान शेख, अनिस शेख, जावेद खान, अतिक शेख, अ‍ॅड. फारूक बिलाल, उबेद शेख आदींनी परिश्रम घेतले. नॉलेज पार्क चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन केले जात असून, पुण्यात सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती या वेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment