नगर । प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंनी महाराष्ट्राची मान उंच केली आहे. सारडा महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले आहे. सर्व खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन क्रीडा शिक्षकांनीच केले आहे. क्रीडा क्षेत्रात क्रीडाशिक्षकांची मोलाची कामगिरी आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांनी केले.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अ. नगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडाशिक्षक कार्यशाळा पेमराज सारडा महाविद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्या डॉ. रेखी यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी क्रीडा व शारीरिक महासंघाचे (पुणे) अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, पर्यवेक्षक डॉ. मंगला भोसले, मिलिंद क्षीरसागर, प्रवीण परुळेकर, प्रदीप चोभे, डॉ. शारदा महांडुळे, अप्पासाहेब शिंदे, संजय धोपावकर, प्रा. संजय साठे, सुनील कुलकर्णी, प्रताप बांडे, राजेंद्र कोहकडे, शैलेश गवळी, अनिल गायकवाड, तुवर पाटील, संतोष ठाणगे, नीलेश बडजाते, कल्पेश भागवत, श्रीमती बुरा, बळीराम सातपुते आदी उपस्थित होते.
सारडा महाविद्यालयाचे शारीरिक क्रीडा संचालक प्रा. संजय साठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू कुताळ हाडशीळ, आदित्य धोपावकर, प्रणिता सोमन यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत 450 क्रीडाशिक्षकांनी सहभाग घेतला.
यावेळी क्रीडा अधिकारी खुरांगे म्हणाले, शारीरिक शिक्षणाशिवाय कोणताच क्रीडा प्रकार होत नाही. खेळाडूसाठी फिजिकल फिटनेस गरजेचा आहे. क्रीडा क्षेत्रात क्रीडा शिक्षकांची चांगली कामगिरी आहे. खेलो इंडियात 228 पदक जिकून महाराष्ट्र अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय कामगिरी करणार्या खेळाडूंना तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येते. तसेच खेळाडूंना नोकरीत 5 टक्के आरक्षणही देण्यात येते. मैदानी खेळाला चांगले दिवस आल्याने अशा क्रीडा कार्यशाळेची गरज आहे.
डॉ. शारदा महांडुळे म्हणाल्या, समाजात आहाराविषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे. चुकीचा आहार घेतल्याने 90 टक्के आजार संभवतात. किती खातो, त्यापेक्षा आपण काय खातो हे महत्वाचे आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी योग्य प्रमाणात आहार घ्यावा. हॉटेलचे पदार्थ व चायनीज खाऊ नये, जेवणाचा डबा आणावा.
प्रास्ताविक अरुण चंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन भरत बिडवे यांनी केले. मकरंद कोर्हाळकर यांनी आभार मानले. सारडा महाविद्यालयाचे प्रा. संजय साठे यांनी कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment