Monday, 4 February 2019

छावणी परिषदेच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात


नगर । प्रतिनिधी - अहमदनगर छावणी परिषद व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेसिडेंट कॅप 2019 - राज्यस्तरीय भव्य फुटबॉल टुर्नामेंटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेशन हेडक्वॉटरचे कर्नल पारखे, अहमदनगर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष मुसा सय्यद, छावणी परिषदेचे सदस्य संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव, अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे सचिव गॉडवीन डिक, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहसचिव गोपीचंद परदेशी, अहमदनगर क्लबचे व्यवस्थापक सिंग, परिषदेचे प्रशासकीय अधिकारी शांतीकुमार शिरकुल, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, स्वछता निरीक्षक गणेश भोर यांच्यासह छावणी परिषदेचे कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बी. एस. श्रीवास्तव म्हणाले, अहमदनगर छावणी परिषदेमार्फत दरवर्षी फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे हे 12 वे वर्ष असून राज्यभरातून विविध संघ या राज्यस्तरीय फुटबॉल टुर्नामेंटमध्ये सहभागी होत असतात. 8 फेब्रुवारीपर्यंत फुटबॉल सामने होणार आहेत. 
दि. 8 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदनगर क्लब परिसरातील मैदानात सर्व सामने होणार असून नागरिकांनीही या सामन्यांना उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कलाशिक्षक अरविंद पुडिया यांनी केले.

No comments:

Post a Comment