नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र ही निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविली जाते. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले सभापती पदासाठी तर सेनेकडून गणेश कवडे, योगीराज गाडे, भाजपकडून मनोज कोतकर यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. युतीचा अंतिम निर्णय आज संध्याकाळी होणार आहे त्यांतरही गणिते बदलण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या सभापती पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या शिवालयात सेना नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत गणेश कवडे, योगीराज गाडे व सुभाष लोंढे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु एकाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. राठोड यांनीही निर्णय राखून ठेवला आहे. मात्र सोबर चेहरा म्हणून गणेश कवडे यांच्या नावाला बैठकीत हिरवा कंदील दिला गेल्याचे समजले. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी पुष्पा बोरूडे यांचे नाव सध्या अग्रेसर आहे.
भाजपकडून सभापती पदाचा शब्द कोणालाच दिलेला नाही. किंवा पालकमंत्री राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांनी याबाबत अद्याप बैठक घेतलेली नाही. युती झाल्यास काय निर्णय घ्यावयाचा व न झाल्यास कोणती भूमिका घ्यावयाची याबाबत महत्वाची चर्चा नामदार शिंदे व गांधी यांच्यामध्ये होणार आहे. बसपाच्या नगरसवेकांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिल्याने मुद्दस्सर शेख यांना स्थायीचा शब्द भाजप नेत्यांकडून देण्यात आला होता. मात्र युतीमूळे यात बदल होऊ शकतो. बदल झाल्यास भाजपकडूनही इच्छुकांची संख्या वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीतही भाजपकडून मनोज कोतकर इच्छुक असल्याचे दिसते आहे. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी लता शेळके, नन्नावरे व सोनाबाई शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु युती झाल्यास या नावांमध्ये बदल होऊ शकतो. युतीचा निर्णय वरिष्ठांकडून येणार असून आज संध्याकाळी भाजप व सेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये युतीचा धर्म पाळण्याचे निश्चीत झाल्यास सर्व गणिते बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अद्याप सदस्यांना व नगरसेवकांना कोणताच निर्णय मिळालेला नसल्याने सर्वच संभ्रमात आहेत. युती झाल्यास राष्ट्रवादी उमेदवारी करणार यात शंका नाही. राष्ट्रवादीने उमेदवारी केल्यास युतीचे सदस्य युतीचा धर्म पाळणार का? याबाबतही शंकाच आहे.
No comments:
Post a Comment