नगर । प्रतिनिधी - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ऍण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.4 मार्च ते दि. 31 मार्च या कालावधीत विविध मोफत आरोेग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच. मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 200 बेडस्चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान एमआरआय तपासणी 2 हजार रुपये, सीटी अँजिओग्राफी 1500 रुपये, सिटी स्कॅन 1000 रुपये, सोनोग्राफी 350 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 200 रुपयात केली जाणार आहे.
शिबिराला सोमवार दि.4 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण 85 हजार रुपयात, संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह 55 हजार रुपयांत करण्यात येणार आहे. यासह ए.सी.एल., रि-कन्स्ट्रक्शन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. याशिवाय याच दिवशी पू.आनंद, पू.अचल गुरू फौंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने लहान मुलांचे अस्थिव्यंग तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यात मुलांवरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील.
दि.7 मार्च रोजी हर्निया, हायड्रोसील व इतर जनरल शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. यात सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अॅपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील शस्त्रक्रिया प्रत्येकी 4 हजार रुपयांत केल्या जातील.
दि.9 मार्च रोजी पोटाचे आजार, सर्व प्रकारचे यकृताचे (लिव्हर) व स्वादुपिंडाचे (पॅनक्रिया) आजार, कॅन्सर निदान व उपचार, सर्व प्रकारच्या स्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी 1800 रुपये, स्कोपी 2200 रुपयात केल्या जातील. शिबिराची वेळ दुपारी 12 ते 3 अशी राहील.
दि.12 मार्च रोजी बालरोग तपासणी शिबिर होणार आहे. दि.13 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबिर होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे रेडिओथेरपी उपचार नाशिक येथील नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातील. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रूग्णांना याचा लाभ मिळेल.
दि.14 मार्च रोजी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी आणि चिकित्सा शिबिर होणार आहे.
दि.15 मार्च रोजी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे हे शिबिर होईल.
दि.16 मार्च रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल.
दि.18 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत सलग महिनाभर दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबिर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, हर्नियाची शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10 हजार रुपये, ऍपेंडिक्स शस्त्रक्रिया 6 हजार रुपये, मूळव्याधीवर इंजेक्शन व्दारे उपचार 2 हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी टेस्ट 2 हजार रुपये, लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 2 हजार रुपये, गॅस्ट्रोस्कोपी 500 रुपयात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियांसाठी औषधे, जाळीचा व इतर खर्च वेगळा असेल.
दि.19 मार्च रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातील. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपण, सिझेरियनच्या फीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. यात लहान मुलांच्या जन्मजात हातांच्या समस्या, व्यंग, मधुमेहाच्या जुनाट जखमा, पायाचा जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्यावरील व्रण आदींवर प्लास्टिक सर्जरी केली जोईल.
दि.22 मार्च रोजी कान, नाक, घसा तपासणी शिबिर होणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ऑडिओमॅट्री तपासणी मोफत केली जाणार आहे. आवश्यक रूग्णांना मोफत श्रवणयंत्र दिले जाणार आहे. यासाठी रूग्णांनी आवश्यक कागदत्रांसह उपस्थित रहावे. ही योजना शिबिराव्यतिरिक्तही आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
दि.23 मार्च रोजी प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी व उपचार शिबिर होणार आहे. दि.27 मार्च रोजी होमिओपॅथी शिबिर, थायरोईड व इतर हार्मोन्स विकार, त्वचा विकार शिबिर होणार आहे. दि.29 मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे.
दि.30 मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबिर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅपसह 2 हजार 800 रुपये, दातांच्या नसावर सिरॅमिक कॅपसह उपचार 3200 रुपये, रूट कॅनल 1600 रुपये, दातांची कवळी बसवणे 7 ते 14 हजार दरम्यान, दात साफ करणे, दातामध्ये सिमेंट भरणे 400 रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दि.31 मार्च रोजी हृदयरोग शिबिराने या शिबिरांची सांगता होणार आहे.