नगर । प्रतिनिधी -
शालेय शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य ज्ञान आवश्यक असून येत्या काळात विद्यार्थ्यांना याची नितांत गरज भासणार आहे हे ओळखून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संगीत, नाट्य व नृत्य याचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या शेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्यु.कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ फाईन अँण्ड परफोरमिंग आर्ट विभागाच्या संदर्भात पालक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेशभाई झंवर, सदस्य बजरंग दरक, प्रभारी प्राचार्या सौ.राधिका जेऊरकर, नृत्य प्रशिक्षिका सौ.वर्षा पंडीत, कु.जास्वंदी खैरनार, देविदास सोहोनी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे संस्थेचे धोरण असून त्यासाठी सतत नवनवीन योजना व उपक्रम राबविले जातात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
डॉ.शरद कोलते म्हणाले की,आजच्या बदलत्या काळात किती टक्के मार्क मिळाले यापेक्षा किती कौशल्य व कलांमध्ये विद्यार्थी निपुण आहे याला अधिक महत्व आले आहे.संवाद, विविध भाषा, नाट्य, नृत्य कलेत पारंगत असणे ही काळाची गरज ओळखून ई.5 वीपासून मुलांना हे ज्ञान शाळेतच मिळावे यासाठी नवीन स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे. सुरवातीला तबला, पेटी, भरतनाट्यम् व कथ्थक नृत्य, याचे प्रशिक्षण सुरु करण्यात येईल. मात्र, यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना यांनी यावेळी सांगितले की, सतत अभ्यास व क्लासेसच्या चक्रात आज मुले अडकली असून पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. मुलांना काय आवडते याकडे खरेतर लक्ष देण्याची गरज असून कला त्यांच्यात आत्मविश्वास वाढवेल. संस्थेने भविष्याचा विचार करून हा नवीन विभाग सुरु करण्याचा विचार केला असून आर्थिक फायद्याची अपेक्षा न करता अष्टपैलू विध्यार्थी घडावेत हीच अपेक्षा आहे.
प्रभारी प्राचार्या सौ.राधिका जेऊरकर यांनी स्वागत केले व मान्यवरांचा परिचय करून दिला. सौ.वर्षा पंडीत व जास्वंदी खैरनार यांनी नृत्यकले विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल याची सविस्तर माहिती दिली. पालकांनी यावेळी विचार व्यक्त करून काही नवीन कल्पना सुचविल्या. सूत्रसंचालन विभाग प्रमुख देविदास सोहोनी यांनी केले तर आभार सौ.मुग्धा देवकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment