Thursday, 4 April 2019

प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी ः कविता शर्मा


नगर । प्रतिनिधी -
लोकसभा निवडणूक काळात भरारी पथके, स्थिर निरीक्षण पथके, व्हीडीओ चित्रण पथकांनी त्यांची कामगिरी चोख बजवावी. निवडणूक प्रक्रिया शांत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षक कविता शर्मा यांनी केले.
येथील नियोजन भवन सभागृहात श्रीमती शर्मा यांनी विविध घटकांचा खर्चविषयक बाबींचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पाटील, लोकसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च संनियंत्रण अधिकारी श्रीकांत अनारसे, विजय कोते, कोषागार अधिकारी महेश घोडके, आयकर विभागाचे अधिकारी महेश लोंढे आदी उपस्थित होते.
खर्च नियंत्रण समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पथकांकडून आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा श्रीमती शर्मा यांनी घेतला. नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही आवश्यक आहे. मतदारसंघात होणार्‍या पैशाच्या व्यवहारांवर आणि वाहतूकीवर स्थिर निरीक्षण पथक आणि भरारी पथकांनी लक्ष ठेवावे. पैसा आणि अवैध दारु तसेच बेकायदेशीर प्रचारसाहित्याच्या वाटप आणि वितरणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विविध पथकांनी आणि निवडणूक यंत्रणेने समन्वयाने काम केले तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल. प्रत्येक घटकांनी त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे हयगय होता कामा नये. प्रत्येकाने त्यांना नेमून दिलेल्या जबाबदारीचे वेळेवर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आता निवडणूक प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे. परंतु प्रत्येकाला काय करायचे आहे, जबाबदारी काय आहे, यासाठी ही बैठक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक प्रचार वेग घेईल. त्यावेळी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
 यावेळी खर्च संनियंत्रण समिती, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, बँक आदी विभागांनी त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

No comments:

Post a Comment