नगर । प्रतिनिधी -
दिल्लीगेट परिसरात सिध्दीबागेच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आलेल्या घरासह इतर अतिक्रमणांवर मनपाच्या झेंडीगेट प्रभाग कार्यालयाकडून सोमवारी (दि. 8) कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी अशोक साबळे व एस. बी. साठे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
नगर शहर व उपनगर परिसराला जोडणारा व कायम वर्दळ असलेल्या या रस्त्यावर सिध्दीबागेच्या संरक्षक भिंतीलगत पथारी व्यावसायिक व हातगाडी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली होती. काही दिवसांपूर्वीच एकाने चक्क पत्र्याची शेड उभारून रस्त्यालगतच घरही बांधले होते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणांमुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग कार्यालयाने सोमवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारत ही अतिक्रमणे हटविली. दरम्यान, अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर काही वेळातच अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमणे केल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात मनपा अधिकार्यांशी संपर्क साधला असता सूचना देऊनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment