Friday, 12 April 2019

मोदींच्या सभेत भाषण रोखल्याने खा. दिलीप गांधींची सटकली!


नगर । प्रतिनिधी -
लोकसभेच्या नगर मतदारसंघातील  भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आयोजित केली होती. मोदींचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण आटोपते घ्या अशी सूचना केली. त्यावर गांधी यांची सटकली. त्यांच्या चेहर्‍यावरती राग दिसू लागला. त्याच त्यांनी  मी अजून बोलणार आहे असे ठणकावून सांगितले. मला दोन मिनिटे बोलू द्या, अशा शब्दात त्यांनी जिल्हाध्यक्ष  प्रा.भानुदास बेरड यांना सुनावले. यावेळी तेथे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. खासदार दिलीप गांधी हे व्यासपीठावर भाषण करण्यासाठी आले होते. त्यानंतर खा. गांधींनी भाषणाला सुरुवात केली. ते  स्वतः केलेल्या विकासकामांची जंंत्री वाचत असतानाच त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न झाला, असे पहायला मिळाले. यावरून त्यांची सटकली आणि त्यांनी खडेबोल सुनावत ‘मी भाषण करत आहे. माझे भाषण अजून पूर्ण झाले नाही’ असे म्हटले. मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असं म्हटलं जातं. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे, असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. बोलताना त्यांचे डोळे पाणावले असल्याचे चित्र होते. व्यासपीठावरील माइक मिनिटभरासाठी बंद होता. गांधींनी खडेबोल सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले.
त्यानंतर गांधी यांनी भाषण केले. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. दरम्यान, भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्यामुळे  जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment