Monday, 15 April 2019

सोशल मीडियावर हल्लाबोल करणार्‍यांची आता होतेय गोची


नगर । प्रतिनिधी -
लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याअगोदर अनेकांनी आपण पुढील काळात ज्या पक्षात प्रवेश करणार आहोत, त्या पक्षाच्या विरोधात अनेक गोष्टी बोलल्याने आता त्या सोशल मीडियावर  जोमाने व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. शहरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या राजकीय भाषणांची चर्चा चांगलीच रंगत असून, नेमके त्या पक्षाबद्दल जे अगोदर बोलत होते ते सत्य आहे की आज ते ज्या पक्षात आहेत त्यातील वरिष्ठ नेते जे सांगत आहेत हे सत्य, हे न उलगडणारे कोडे झाले असून यातून आता निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल की कोण किती सत्य आणि कोण किती असत्य आहे.
शहरात सध्या एका उमेदवाराची चांगलीच गोची झाली असून सध्या त्या नेत्याची चर्चा सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होताना दिसत आहे. वास्तविक ते अगोदर त्या पक्षात जातील असे त्यांनाही स्वप्नात वाटले नव्हते. त्यामुळेच त्यांनी अगोदर म्हणजेच काही महिन्यापूर्वी सत्ताधार्‍यांवर चांगलीच आगपाखड केली होती. त्यावेळी ते म्हणत होते की,  त्यांच्या मनात खोट आहे, ते जातीयवादी आहेत, ते जाती जातीत तेढ निर्माण करतात असे सांगणार्‍या नेत्यांना आता त्याच पक्षात प्रवेश करण्याची वेळ आल्याने त्यांची गोची झाली आहे. आगपाखड करत  काही दिवसांपूर्वी त्यांनी टाळ्या मिळवल्या खर्‍या, पण आता त्याच गोष्टी त्यांना विचारण्यासाठी नागरीक पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ते जेव्हा त्या  पक्षात नव्हते व त्यांना अपेक्षाही नव्हती त्या पक्षात आपल्याला प्रवेश करावा लागेल, अशावेळी त्यांनी प्रवेश केलेल्या पक्षावर तोंडसुख घेतले. यावरुन आता कार्यकर्ते चांगलेच सोशल मीडियाला वैतागले असल्याचे चित्र आहे. तसेच उत्तर काय द्यायचे हे देखील कार्यकर्त्यांना कळेनासे झाल्याने त्यांनी सोशल मीडियावर काहीच न बोलता अशा व्हायरल क्लिपकडे डोळेझाक करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने नुकताच एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. अगोदर या नेत्याने त्या पक्षाच्या नेत्यांवर मोठा हल्लाबोल केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, पेट्रोल वाढ केली, सत्ताधार्‍यांनी वेडे बनवले आहे. आज धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर विष कालवण्याचे काम कोणी केले? असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र आता विष कालवलेल्या पक्षामध्येच त्या नेत्याला डेरेदाखल व्हावे लागल्याने जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मी त्या पक्षात जाणार नाही असे  छातीठोकपणे सांगून त्यांनी आता त्या पक्षात जाण्याची तयारीच नाही तर ते पक्षात दाखल झाले आहेत. यातून आता कार्यकर्ते चांगलेच धास्तावले असल्याचे चित्र आहे. ज्यांच्यावर आत्तापर्यंत हल्लाबोल केला  त्यांच्याच  दावणीला  आपण जायचे का? असाच काहीसा प्रश्न छोट्या-छोट्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पडला आहे. 

No comments:

Post a Comment