Tuesday, 16 April 2019

महावीर जयंतीनिमित्त बालगृह संस्थेला पुरणपोळीच्या जेवणासाठी किराणा भेट


नगर । प्रतिनिधी -
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहेत. असे असले तरी आजही समाजात अनेक कारणांमुळे मुलांना वंचिताचे जगणे जगावे लागते. मायेची ऊब मिळवण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फत चालवण्यात येणार्‍या वसतिगृहात, आश्रमात वास्तव्य करावे लागते. सण उत्सवानिमित्त त्यांना गोडधोड भोजनाचा आस्वाद देवून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुललेले पाहणे खूप आनंददायी असते. भगवान महावीर स्वामीजी यांनीही आपल्या उपदेशातून नेहमीच मनुष्यरुपी ईश्वराची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यामुळे महावीर जयंतीनिमित्त रिमांड होममधील मुलांना गोडधोड पुरणपोळीचे जेवण मिळावे यासाठी एकत्र येत किराणा साहित्याची मदत दिली. या कार्यातून मनाला खर्‍या अर्थाने समाधान लाभत आहे, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक मंडळाचे सदस्य तथा नवीपेठ येथील रोहित कॉस्मेटिक्सचे संचालक शरद मुथा यांनी केले.
नवीपेठ जय आनंद महावीर युवक मंडळाचे सदस्य मनोज गुंदेचा, शरद मुथा, संतोष कासवा,योगेश मुनोत, कुंतीलाल राका, प्रमोद गांधी या सहा जणांनी एकत्र येत महावीर जयंतीनिमित्त नगरमधील मुला मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह संस्थेतील मुलांना पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी किराणा दिला. महावीर जयंतीनिमित्त मुलांना गोड जेवण मिळावे यासाठी संस्थेला गहू, तांदूळ, चणा डाळ, तेल, गूळ, पापड असा किराणा देण्यात आला. संस्थेच्या अधीक्षिका पौर्णिमा माने, लिपिक आनंद देशमुख यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली.
संतोष कासवा म्हणाले की, सामाजिक जाणीवेतून आम्ही महावीर जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला. प्रत्येक जण सण उत्सव आपल्या परिवारासमवेत, मित्रांबरोबर साजरा करतो. स्वत:साठी काही तरी चांगले करणे ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असली तरी गरजू, वंचितांना देण्यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे संवेदनशील मनाने एक बांधिलकी म्हणून महावीर स्वामींची जयंती अशा मदतीतून साजरी केली आहे. बालगृहातील मुलांना अशा मदतीची मोठी गरज आहे. संस्थेला रोख मदतीसह वस्तुरुपानेही मदत करता येते. या संस्थेतील मुले, मुली शिक्षण घेतानाच स्वत:च्या पायावर उभे रहावेत यासाठी संस्थेतच लघुउद्योग उभारुनही एक मोठे कार्यही होवू शकते. आपले वाढदिवस, खास क्षण या मुलांसमवेत साजरे करून त्यांना अत्यावश्यक असलेल्या वस्तू, कपडे, शैक्षणिक साहित्य, खेळण्यांची भेटी देता येवू शकते. संस्थेला दिलेले जाणारे अर्थसहाय्य कलम 80 जी अन्वये करमुक्त आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या संस्थेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन कासवा यांनी केले.
पौर्णिमा माने म्हणाल्या, संस्थेत मुलांना सर्व सण उत्सवांचा आनंद मिळवून दिला जातो. सर्व कार्यक्रमही उत्साहात केले जातात. या कार्याला हातभार लावण्यासाठी संस्थेला मदत करून इच्छिणार्‍यांनी 0241- 234522, 2342949 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment