Wednesday, 10 April 2019

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस आजन्म कारावास


नगर । प्रतिनिधी -
पत्नीस मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी दाखल खटल्यात आरोपी पती गोरक्षनाथ यादव गिते (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यास जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी दोषी ठरवून आजन्म कारावास व रुपये पाच हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली.
खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल बांदल यांनी सहाय्य केले.
खटल्याची थोडक्यात हकीगत अशी, रेणुका भाऊसाहेब कल्हापुरे यांचा विवाह सन 2011 मध्ये गोरक्षनाथ यादव गिते याच्याशी झाला होता. नंतरच्या काळात रेणुकाची धाकटी बहीण हिस गोरक्षनाथ गिते याचा भाऊ पांडुरंग याच्यासाठी मागणी झाली होती. ती रेणुका हिच्या आई-वडिलांना मान्य नव्हती. या कारणावरून गिते कुटुंबीय रेणुकाचा छळ करत होते.
यातून रेणुकाने विष प्राशन केले, असा बहाणा करून पती गोरक्षनाथ गिते याने तिला उपचारार्थ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वी ती मयत झाली. तिचा मृत्यू हा छातीतील बरगड्या फ्रॅक्चर व पोटात झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचा वैद्यकीय अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. खटल्यात मयत रेणुका हिचा भाऊ तसेच आई, डॉ. नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक नागवे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

No comments:

Post a Comment