शेवगाव । प्रतिनिधी -
दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत आपल्या मतदार संघातील जिरायती भागातील लोकांना डॉ. सुजय विखे पाटील निश्चित न्याय मिळवून देतील, असा विश्वास आ. मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील भातकुडगाव, भायेगाव, वक्तरपुर, मजलेशहर आदी ठिकाणी आ. मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी झालेल्या प्रचार सभांमधून आ. मोनिकाताई राजळे यांनी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांची कशी गरज आहे हे मतदारांना पटवून दिले.
तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही बाकी आहेत. जिरायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्या या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची गरज आहे. केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासारख्या अभ्यासू उमेदवाराची खरी गरज आहे. केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेतूनच या भागाचा पाणीप्रश्न सुटू शकतो. याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे डॉ. सुजय विखे पाटील निश्चित करतील, असा विश्वास आ. राजळे यांनी व्यक्त केला.
उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई आहे. कोणाबद्दल व्यक्तिद्वेष करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे आपण मतदारांपुढे मांडले आहेत. निवडणूक लढविण्यापूर्वीच या भागाचे प्रश्न आपण समजून घेतले, या प्रश्नांचा अभ्यास केला. त्यामुळेच आत्मविश्वासाने तुमचे प्रतिनिधित्व करताना या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी भूमिका राहील. या मतदार संघात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे निर्णय अद्यापही बाकी आहेत. पाण्याच्या प्रश्नांच्या प्राधान्यक्रम आपण ठेवलेला आहेच, यापूर्वी देखील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या सर्व राजकीय जीवनात पाण्यासाठीच संघर्ष केला. नदीजोड प्रकल्पासारख्या योजनांची सूचना त्यांनी सरकारला केली, आज त्याचे धोरण तयार झाले आहे. या धोरणाचे प्रतिबिंब आपल्या मतदारसंघात येणार्या काळात निश्चित दिसेल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
शेवगाव तालुक्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरीक आणि युवकांनी त्यांच्या उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सर्व मतदारांशी संवाद साधत विखे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुचनाही जाणुन घेतल्या, युवकांचे प्रश्नही समजून घेतले. याप्रसंगी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment