Saturday, 20 April 2019

जागरुक नागरिक मंचतर्फे नगरच्या प्रश्नांवर महाचर्चा


नगर । प्रतिनिधी -
नगर शहर व जिल्हा गेल्या 30-40 वर्षांपासून आहे, त्या स्थितीत आहे. रस्ते, वीज, पाणी, खड्डे, बाह्यवळण रस्ता, एमआयडीसी, बेरोजगारी व उड्डाणपूल, अतिक्रमण अशा समस्यांनी ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी जागरुक नागरिक मंचने मतदार जागृती अभियान व मतदारांची उदासीनता हटवून 100 टक्के मतदान घडून आणण्यासाठी महार्चेचे आयोजन शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केले होते. या महाचर्चेत आपली निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व 19 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. मात्र केवळ तीन उमेदवारांनीच या महाचर्चेस उपस्थितीत लावली. उमेदवारांबरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागरुक नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून ‘ऐतिहासिक नगर-भौगोलिक निवडणूक व संभ्रमात नागरिक’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या महाचर्चेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार साईनाथ घोरपडे, अ‍ॅड.कमल सावंत व फारुक शेख या तीन उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्यावतीने अरविंद शिंदे यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबरच सुरेखा सांगळे यांनी एमआयडीसीचा प्रश्न, नलिनी गायकवाड यांनी बाह्यवळण व सीना नदीचा प्रश्न, शारदा होशिंग यांनी स्वच्छतेचा प्रश्न, निर्मला भंडारी यांनी आय.टी.पार्कचा प्रश्न, विलास पेद्राम यांनी पहाटे सुटणार्‍या पाण्याचा प्रश्न, राजू शेख यांनी वाडिया पार्कमधील गाळ्यांचा प्रश्न या महाचर्चेत उपस्थित करुन थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कैलास दळवी यांनी केले तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, अमृत बोरा, अनमान शेख, पुरुषोत्तम गारडे, योगेश गणगले, बी.यू.कुलकर्णी, अमेय मुळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment