Tuesday, 9 April 2019

रिमांड होममधील मुला-मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी


नगर । प्रतिनिधी -
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागरुक नागरीक मंचच्या वतीने रिमांड होममधील 8 ते 18 वयोगटातील 121 मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. 
डॉ. मंगेश जहागीरदार, डॉ. उमेश कांबळे, डॉ. पूनम कापकर, डॉ.सौ. कांबळे आदी तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात मुला-मुलींची तपासणी केली. या तपासणीत विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीहिनता, टॉन्सिल्स्, प्राथमिक क्षयरोग, अशक्तपणासारखे गंभीर आजारांचे निदान झाले. पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने तज्ञ डॉक्टारांकडे सोपविण्यात आले.
जागरुक नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रिमांड होम संस्थेचे सचिव अ‍ॅड. गोविंद मिरीकर, माजी उपमहापौर गीतांजली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. उद्धव दुसुंगे, प्रा. मधुसूदन मुळे, प्रा.किसनराव लोटके आदींसह जागरूक नागरिक मंचाचे सदस्य व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.कांबळे म्हणाले, जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून दुर्धर आजार वाढत आहेत. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करुन जास्तीत जास्त जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहेत. जागरुक नागरिक मंचने पुढाकार घेवून रिमांड होममधील वंचित विद्यार्थ्यांकरिता राबविलेला आरोग्य शिबिराचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे.
डॉ.कापकर म्हणाल्या, लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात शारीरिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. लहानपणीच आजारांवर योग्य उपचार होते गरजेचे आहे. लहान मुला-मुलींनीही चांगले अन्नपदार्थ खाऊन भरपूर व्यायाम करावा. जेणेकरुन बुद्धी तल्लख होऊन अभ्यासातही हुशार व्हाल, असे सांगून उत्तम आरोग्याबद्दल काही महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संयोजक सुहास मुळे म्हणाले, जागरुक नागरिक मंच अनेक वर्षापासून नगरमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत. त्याचबरोरच रिमांड होममधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. यासाठी पाच तज्ञ डॉक्टरांनी बहुमोल सहकार्य केले आहे.
यावेळी प्रा. मधुसूदन मुळे, डॉ. सौ.कांबळे यांनाही आपले विचार व्यक्त केले.  यावेळी जागरुक नागरिक मंचचे उपाध्यक्ष प्रा.सुनील पंडित, सचिव कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, जयकुमार मुनोत, छाया चंगेडिया, निर्मला कोठारी, शामला साठे, सुरेखा सांगळे, शारदा होशिंग आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment