Wednesday, 17 April 2019

सुख सामाजिक बंधच्या ‘साहस’ पुरस्कारांचे वितरण


नगर । प्रतिनिधी -
आज समाजामध्ये नकारात्मकता पसरत आहे. सोशल मीडियाचा वापर हा समाजासाठी घातक होत आहे. एखादी चांगली-वाईट घटना नकारात्मक किंवा विरोधात्मकरित्या तयार करुन ती जाणीवपूर्वक पसरविली जाते आणि त्या घटनेची सत्यता पडताळून न पाहता प्रत्येकजण दुसर्‍यांना पाठवतो. त्यामुळे समाजामध्ये नकारात्मकता वाढत आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादीत होऊन सुसंस्कृत लोकांनी यावर उपाय करणे गरजेचे आहे.  सुख सामाजिक बंध या संस्थेच्यावतीने समाजातील प्रतिष्ठितांना पुरस्कार देऊन समाजात सकारात्मकता वाढवण्यासाठी होणारा प्रयत्न कौतुकास्पद आहे. असे उपक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
येथील सुख सामाजिक बंध संस्थेच्यावतीने विविध  क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा ‘साहस’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुधीर लंके होते. यावेळी  मनगाव प्रकल्पाचे प्रणेते डॉ.राजेंद्र धामणे, सौ.डॉ. सुचेता धामणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश भोसले, आदर्शगांव कासारेचे सरपंच धोंडीभाऊ दातीर, संस्थेचे  मार्गदर्शक सुखदेव शेडाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुखदेव शेडाळे म्हणाले, युवकांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी संघर्षमय प्रवास असणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला आहे. त्यामुळे युवकांमध्ये सकारात्मक भावना  वृद्धींगत होण्यासाठी मदत होऊ शकेस. शून्यातून विश्व निर्माण करणारे, जीवनात संघर्ष, सचोटी, प्रामाणिकपणा, जीवनात खडतर व अपार मेहनत घेऊन ताठ मानेने जगण्याचा नवीन मार्ग शोधणार्‍या या व्यक्ती आहेत.  दुसर्‍याच्याही जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी रोजगार मिळवून देऊन त्यांनाही आनंदी करणार्‍या 11 रत्नांचा ‘साहस’ पुरस्काराने सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘साहस’ पुरस्कारार्थींमध्ये अण्णासाहेब म्हस्के- संस्थापक स्वर्णमाला पतसंस्था, संतोष हरबा- कलाकार, विष्णूशेठ मेंघानी- उद्योजक, हभप तुळशीराम महाराज लबडे, भास्करराव महांडूळे- उद्योजक, बाळासाहेब उबाळे- व्यावसायिक, जितेंद्र गांधी- व्यावसायिक, शुभम राऊत - तबलावादक, मनीष झंवर- प्रिटींग व्यवसाय, जगन्नाथ बोरुडे - बांधकाम व्यावसायिक, रोहिदास कोकणे- श्रमिक उद्योग समूह यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.राजेंद्र धामणे, भगवान फुलसौंदर, गणेश भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना सुख सामाजिक बंध या संस्थेने सहासी धाडसी, व्यक्तींच्या कार्याची नोंद घेऊन समाजात नव्या दमाने, नव्या जोमाने काम करण्यासाठी पाठीवर थाप दिली व पुन्हा एकदा नवचेतना दिली, अशा भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक पारूनाथ ढोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन  दिलीपराव गलांडे यांनी केले. प्रा.तुकाराम अम्रीत यांनी आभारमानले.

No comments:

Post a Comment