Saturday, 20 April 2019

डोंगरगणच्या निसर्गरम्य परिसरातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी सरसावला महावीर चषक परिवार


नगर । प्रतिनिधी -
मागील वर्षी वरूणराजाने केलेली अवकृपा व आताच्या उन्हाळ्यात सूर्यनारायणाचा होत असलेला प्रकोप यामुळे प्रत्येकाची लाहीलाही होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत केव्हाच आटले असून नगरजवळील हॅपी व्हॅली अशी ओळख असलेला गर्भगिरीच्या डोंगररांगेतील डोंगरगणचा परिसरही पाण्याअभावी मलूल झाला आहे. येथील पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगररांगातून खळखळ वाहणारे पाणी गायब झाले आहे. समस्त प्राणीमात्रांप्रती करूणेचा संदेश देणार्‍या भगवान महावीर स्वामींच्या जयंतीदिनी मुक्या प्राण्यांवर दया करा, अहिंसा परमो धर्म:, जगा व जगू द्या या तत्वांना अनुसरून नगरमधील महावीर चषक परिवाराने थेट डोंगरगण गाठून या भागातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी तब्बल 25 हजार लिटर पाणी टँकरने सोडले. या उपक्रमातून सर्वांनी प्रत्यक्ष कृती करून महावीरांचा संदेश आचरणात आणत महावीर जयंती साजरी केली. कडक उन्हात अवतरलेल्या या जलधारांनी वन्यजीवांसह पक्षी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मुक्या जीवांचा किलबिलाट श्रवण करीत सर्वांनी डोंगरदर्‍यात भटकंती केली आणि गप्पाष्टके रंगवत भेळभत्त्याचा आस्वाद घेतला.
कडक उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी निसर्गात मुक्तपणे विहार करणारे वन्यजीव, पक्षी यांचीही चारापाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: नगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण परिसरालाही यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. ब्रिटीशकाळात उन्हाळ्यात ब्रिटीश अधिकारी आवर्जून या निसर्गरम्य परिसरात जात असत. आता कमी पर्जन्यमान तसेच अन्य कारणांनी या निसर्गरम्य परिसरालाही उतरती कळा लागल्याने या डोंगरदर्‍यातील वृक्षवेली कोमजल्या आहेत. नैसर्गिक पाणवठे केव्हाच आटले आहेत. त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांचीही तगमग होत आहे. त्यामुळेच महावीर चषक परिवाराने नगरहून टँकरने पाणी नेवून ते या भागातील नैसर्गिक पाणवठ्यात सोडण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी महावीर चषक परिवाराचे संजय चोपडा, राजेंद्र ताथेड, प्रीतम पोखरणा, प्रफुल्ल मुथा, डॉ.सचिन बोरा, प्रवीण शिंगवी, सी.ए.आनंद गांधी आदी उपस्थित होते. निसर्ग मित्र मंडळाचे भैरवनाथ वाकळे, राजेंद्र गांधी व त्यांचे समविचारी सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून या भागात टँकरने पाणी सोडून वन्यजीवांना मायेचा ओलावा देत आहेत. त्यांनी तब्बल 10 टँकर पाणी या परिसरात सोडले आहे. ऋषीकेश लांडे, विद्यासागर पेटकर, संजय दळवी यांनीही या उपक्रमात सहभाग घेत पक्ष्यांची, वन्यजीवांची माहिती देत आपल्या कॅमेर्‍यात या सजीवांचे बागडणे कैद केले. चिमणी, निलीमा, किंगफिशर, होले, नर्तक यांच्यासह दुर्मिळ समजल्या जाणार्‍या शृंगी घुबडाचेही दर्शन यावेळी सर्वांना झाले. आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड व प्रितम पोखरणा यांनी यावेळी उन्हाळा संपेर्यंत या परिसरात महावीर चषक परिवार वेळोवेळी टँकरव्दारे पाणी सोडून वन्यजीव, पक्ष्यांची काळजी घेईल, असे सांगितले.
नगरकरांसाठी डोंगरगणचा परिसर पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचे हक्काचे केंद्र आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी या परिसरातील हिरवळ गायब होत आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडणारे पक्षीही कोमजले आहेत. त्यांना त्यांच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम परिसरात नवचैतन्य आणणारा ठरला आहे. सर्वांनी अतिशय उत्साहात डोंगरगण परिसरात भटकंती करीत पक्ष्यांच्या किलबिलटाच्या मधुरसंगीताचा आनंद लुटला. भेळभत्त्याचा आस्वाद घेत मनमोकळ्या गप्पांचाही आनंद घेतला.

No comments:

Post a Comment