नगर । प्रतिनिधी -
भारतीय समाजजीवनात प्रत्येक दिवसाची सुरुवात एकमेकांला राम-राम करुन होते. तर जीवनाचा शेवटही रामनामानेच होता. इतका आपल्या आयुष्यात राम ओतप्रोत भरलेला आहे. आपल्या आयुष्याला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी श्रीराम कथा आहे. कारण श्रीरामाचे जीवन म्हणजे मानवी जीवनाच्या सद्गुणांचे साक्षात प्रतीक आहे. आपल्याला आदर्श समोर असावा लागतो. म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणे सोयीचे जाते. रामायण ही एक दिशा आहे. कारण ते आबालवृद्धाला मनापासून आवडते. श्रीरामाने केलेले कार्य समाज जीवनाचा आदर्श आहे, असे प्रतिपादन हभप गोविंद महाराज शास्त्री यांनी केले.
श्रीरामनवमी निमित्त बुरुडगांवरोड, श्रीरामनगर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी हभप गोविंद महाराज शास्त्री यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसंघर्ष मित्रमंडळ व श्रीराम भक्त सेवा मंडळाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दुपारी सजवलेल्या पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा हलविण्यात येऊन महिलांनी पाळणा गायला. श्रीरामनवमीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. किर्तनानंतर श्रीराम जन्मोत्सव झाला, यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी श्रीरामनगर, साळुंकेमळा, चौरे मळा, बाबर मळा, पटवेकर मळा, एकाडे मळा, राऊत मळा, नन्नवरे मळा, औसरकर मळा, दरंदले मळा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment