नगर । प्रतिनिधी -
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आकारमानाने मोठा असून, सात विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. यातच आता जवळपास 18 लाख मतदारांपर्यंत आपल्या पक्षाचा आणि स्वतःच्या संकल्पांचा अजेेंडा घेऊन जाणे कोणत्याही उमेदवाराला शक्य नाही. यातून आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
व्हॉटस्अप, ट्विटर, फेसबुक आदींचा उमेदवारांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. तसेच मध्यंतरी वन बूथ 25 यूथ निकषानुसार व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यंदाची निवडणूक सोशल मीडियावर जोमात असल्याने विशेषतः निवडणुकीचे वारे तरुण पिढीपर्यंत वेगाने पोहचले असल्याचे दिसत आहे. सर्वच मतदारसंघांप्रमाणे नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघात युवकांच्या मतदानाची टक्केवारी ही एकूण संख्येच्या 45 ते 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामुळे त्यांच्याशी संपर्काची जबाबदारी युवकांवरच देण्यास यंदा सर्वपक्षीयांनी अधिक प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यात सोशल मीडिया तर पूर्णपणे तरुणांच्याच ताब्यात आहे. फक्त या मीडियावर कोणत्या प्रकारचे मेसेज असावेत, यासाठी ज्येष्ठ मंडळी सूचना करत आहेत. याशिवाय 99 टक्के बुथवरही तरुणाईच तैनात राहणार असल्याचे दिसत आहे.
दुसर्या बाजूला उमेदवार विखे व जगताप यांच्यासह इतर उमेदवारांनीही सोशल मीडियावर आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावल्याचे दिसत आहे. प्रचारासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अपडेट केली जात असून, प्रचाराने सोशल मीडिया व्यापला गेला आहे.
No comments:
Post a Comment