Saturday, 13 April 2019

आडसूळ तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप


नगर । प्रतिनिधी -
आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आडसूळ या उत्कृष्ट महाविद्यालयात पूर्ण होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. अभ्यासाबरोबरच आडसूळ महाविद्यालयाच्या वतीने व्यक्तिमत्त्व विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. अभ्यासासाठी महाविद्यालयात अनुकूल वातावरण आहे. या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षक असून, प्राचार्यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे महाविद्यालयाचा निकाल नेहमीच चढत्या क्रमाने राहिला आहे. प्राचार्यांचे मार्गदर्शन व शिक्षकांची उत्कृष्ट प्रकारे शिकविण्याची पद्धत, या बुद्धीमत्तेच्या जोरावर आम्ही भविष्यात कोठेही कमी पडणार नाही व उज्ज्वल यश मिळवू, असे प्रतिपादन विद्यार्थिनी रक्षा यादव हिने केले.
चास येथील आडसूळ तंत्रनिकेतन कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या निरोप समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी रक्षा यादव बोलत होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध आडसूळ होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष विश्वनाथ आडसूळ, प्राचार्य चंद्रशेखर घुले, डिप्लोमाचे प्राचार्य रमेश गडाख आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध आडसूळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक मार्गाने स्वतःची व समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करावा. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी. जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे. रोजगार निर्मिती करून भविष्यात उत्तम प्रकारे यश संपादन करावे. आपल्या महाविद्यालयाचे व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे ते म्हणाले.
प्राचार्य रमेश गडाख म्हणाले की, महाविद्यालयातील अभ्यासू वातावरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. कुठल्याही क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे काम करून आपला ठसा उमटवावा व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे. भविष्यातील वाटचालीत अडचण व गरज भासल्यास आडसूळ महाविद्यालय, तसेच संस्था कायम सहकार्य करण्यासाठी बांधील आहे, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी कानेगावकर, विशाल बनकर, अभिषेक नेटके, मृणाल वाटेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment