नगर । प्रतिनिधी -
सावेडी उपनगरातील सिव्हिल हडको वसाहतीमध्ये रामनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, भव्य शोभायात्रा व महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सव सोहळ्याचे हे सलग चौथे वर्ष असुन सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे.
प्रभू रामचंद्रांच्या या रामनवमी उत्सव सोहळ्याला चार वर्षापूर्वी म्हणजे, मार्च 2016 रोजी प्रारंभ झाला. आज या सोहळ्याला व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. गेल्या 4 वर्षांपासून संपूर्ण नवनीत नगर (सिव्हिल हडको वसाहत) प्रभू रामचंद्र व सीता मातेच्या जयजयकारात रंगून जाते. स्त्रिया, पुरुष, बालके व आबालवृध्द या सोहळ्यात तन-मन-धनाने आपला सहभाग नोंदवितात हेच या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.
यावर्षी या सोहळ्यांतर्गत आज (दि. 7 सकाळी 8 वाजता भव्य रक्तदान शिबिराने प्रारंभ झाला. उत्सवाकडे केवळ उत्सव म्हणून न पाहता त्याला सामाजिक बांधिलकीचे स्वरुप देण्याच्या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन रामनवमी आयोजकांनी केले होते. या शिबिरात सर्व महिला पुरुष नागरिकांनी सहभाग घेतला.
रामनवमी उत्सव सोहळ्यानिमित्त तीन दिवस प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन निसार हॉस्पिटल जवळच्या दत्त मंदिर पटांगणात करण्यात आले आहे. मंगळवारी ( दि. 9) रात्री 9 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे सागर शिंदे यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेला प्रारंभ होणार आहे. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे पत्रकारिता व मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विनय चाटी हे ‘ काश्मिर ’ या विषयावर व्याख्यानाचे दुसरे पुष्प बुधवारी (दि. 10) गुंफतील तर ‘ छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य ’ या विषयावर गुरुवारी ( दि. 11 )पुण्याच्या बालभारती पाठ्यपुस्तक लेखन समितीचे सदस्य मोहन शेटे हे या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफतील. रामनवमीनिमित्त वसाहत परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment