नवीदिल्ली । वृत्तसंस्था -
काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘न्याय योजने’च्या माध्यमातून ‘गरिबी हटाव’चा नारा दिलेला असतानाच भाजपनेही ’जय जवान, जय किसान’चा नारा देत निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यातून शेतकर्यांना वर्षाला सरसकट 6 हजार रुपये आणि पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे भाजपने राम मंदिर निर्माण व कलम 35 अ रद्द करण्याचाही उल्लेख जाहीरनाम्यात केला आहे.
भाजपने त्यांच्या संकल्पपत्राला ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ असे नाव दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे आज नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यातून शेतकर्यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंतच्या सर्वांची काळजी घेतली आहे. सुरक्षा दलाचे सशक्तीकरण करतानाच त्यांना ‘फ्री-हँड’ देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
याशिवाय अयोध्येत राम मंदिर निर्माणाचाही पुनरुच्चार केला आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार कऱण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी बोलताना राम मंदिर व कलम 35 अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल असे सांगितले.’
No comments:
Post a Comment