नगर । प्रतिनिधी -
कलगी-तुरा ही फार जुनी परंपरा आहे. परंतु आज ही परंपरा लोप पावत चालली आहे. माळीवाडा देवस्थानच्यावतीने दरवर्षी या कलगी-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करुन ही कला जीवंत ठेवण्याचे काम करत आहे. यातील कलगीवाले व तुरेवाले हे कलाकार आपला छंद जोपासण्यासाठी व ही कला प्रचलित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ही अभिमानास्पद अशीच बाब आहे. या कलेची जोपासना होण्यासाठी जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रमात या कलेचा समावेश झाल्यास कलगी-तुर्यास ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी केले.
माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे कलगी-तुरा कार्यक्रमाचा शुभारंभ पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त बाबासाहेब सुडके, गजानन ससाणे, भाऊसाहेब फुलसौंदर, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, गणेश राऊत, राहुल गाडळकर आदी उपस्थित होते.
यामध्ये कलगी पक्षाचे शाहीर एकनाथ पवार (बेलवंडी), विश्वनाथ बोरुडे, तुळशीराम अनारसे, पाराजी पानसंबळ, राजू निमसे यांनी तर तुरा पक्षाचे मुरली सुपेकर, बाबुराव औटी, गोधाराम चौरे, अण्णा चौरे, हेमंत हंडे, ज्ञानदेव बोरुडे, दिगंबर पंडीत, भीमा औटी, बबन चौरे, शिवाजी चौरे, शंकर भुतकर, बाळासाहेब भुतकर, रंगनाथ कोतकर, अंबादास बेद्रे, बबन औशीकर, कान्हू सुंबे, पिराजी लंगोटे, रामा हुच्चे, अशोक जासूद, मारुती शेळके यांनी या कार्यक्रमात उपस्थितांचे मनोरंजन करुन रंगत आणली. ढोलकीपटू हिरामण शिंदे यांनी या सर्वांना साथ दिली.
सदरचा कार्यक्रम पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु होता. शेवटीपर्यंत प्रपंच, गुरुमार्ग, ब्रह्मज्ञान विषयावर होऊन गुरुची महती, गुरु कशासाठी करावा, जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक होण्यासाठी गुरुचे महत्व कलाकारांनी विशद करुन सर्व श्रोत्यांचे समाधान केले. उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सुडके यांच्या हस्ते सर्व शाहिरांना मानाचा विडा देऊन सन्मानित करण्यात आले. अंबादास बेद्रे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अशोक कानडे यांनी मानले. या कायर्र्क्रमास शहराबरोबरच जिल्ह्यातील कलगी-तुरा प्रेमी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment