Tuesday, 16 April 2019

कै. शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन


नगर । प्रतिनिधी -
डॉ. हेडगेवार प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्या मंदिर, कसबे वस्ती, सावेडी येथे कै.शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा.श्री. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.श्री. हरिभाऊ देशमुख होते.
कै. शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन फीत सोडून केल्यानंतर शरदराव कटककर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे शहर संघचालक श्री.शांतीभाई चंदे,  डॉ.हेडगेवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दादाराम ढवाण, कोषाध्यक्ष श्री. अरूणराव धर्माधिकारी, सदस्य श्री. दत्तात्रेय जगताप, सरस्वती विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सतीश झिकरे, सर्वश्री. श्रीकृष्ण कटककर, श्रीराम कटककर, विश्वनाथ कटककर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. अविनाश साठे यांनी स्वागत केले. श्री. अरूणराव धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक करताना 1997 साली सुरू झालेल्या सरस्वती विद्या मंदिरच्या प्रगतीचा आढावा घेत तीनमजली इमारत उभारण्याचा मानस व्यक्त केला. श्री.हेमंत धर्माधिकारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. सतीश झिकरे यांच्या हस्ते प्रा.श्री. नानासाहेब जाधव, डॉ.श्री.हरिभाऊ देशमुख, श्री.शांतीभाई चंदे, श्री.दादाराम ढवाण व श्री. मानसिंग निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सौ.विमल जाधव यांच्या हस्ते सौ.शुभांगी सप्रे यांचा तर सौ.उषा धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीमती वर्षा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. श्री. सुधाकर खर्डेकर यांनी ग्रंथालयासाठी पुस्तकांची भेट दिली.
उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. नानासाहेब जाधव यांनी शरदराव कटककर यांच्या सहवासातील स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1966 मध्ये राहुरी येथे संघाचे शिबिर झाले होते. त्या शिबिरात शरदरावांची  पहिली भेट झाली. 1974 मध्ये संगमनेरला झालेल्या शिबिरात अधिक निकटचा सहवास लाभला. नगरमधून प्रकाश गटणे, पारनेरमधून गजानन पुरकर व बेलापूरमधून मी असे तिघेजण तेव्हा जिल्ह्यामधून प्रचारक म्हणून निघालो असताना बेलापूरला माझ्या निरोप समारंभासाठी शरदराव कटककर आले होते. शिबिराची रचना कशी असावी, शिबिरात कसे रहावे, संघ कार्याचा प्रचार व प्रसार कसा करावा, संघ स्वयंसेवकांना कसे जपावे व प्रोत्साहित कसे ठेवावे, याचा कृतीशील वस्तुपाठ शरदरावांनी आपल्या सर्वांसमोर ठेवला. संघाला अभिप्रेत असलेला या देशाचा विकास कसा झाला पाहिजे? हे शरदरावांसारखे तळमळीने कार्य करत असलेल्यांकडून कळते.
डॉ. देशमुख म्हणाले,  कर्जत व जामखेड तालुक्यात शरदराव कटककर यांनी केलेले संघकार्य भूषणावह आहे. संघाचा प्रचारक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बहुमोल आहे. त्यांनी कधीही कुणालाही दुखावले नाही.  श्रीमद् भगवतगीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. सोशीकपणा, साधी राहणी ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता ते संघाचा विचार आणि संघाचे कार्य जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यात व्यस्त राहिले. हिंदु धर्म- हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगत नवीन पिढीवर त्यांनी ते संस्कार रूजवले. त्यांच्या संस्कारामधून उभा राहिलेला माझा मुलगा मुकुंदा हा पुढे विश्व हिंदू परिषदेचा महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री झाला. त्यांनी ग्रंथावर केलेले प्रेम लक्षात घेऊन त्यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक व जिज्ञासू वाचकांना संघकार्याची स्फूर्ती देत राहील.
लोकसभेच्या मतदानासाठी ऑस्ट्रेलिया-सिडनी येथून आलेल्या श्री. विजय सप्रे (मूळ रा.श्रीगोंदा) यांचा खास सत्कार करण्यात आला. श्री.श्रीराम कटककर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. रामभाऊ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्वश्री. प्रा.व्यंकटेश होळेहुन्नुर, महेंद्रभाई चंदे, मिलिंद चवंडके, सोमनाथ दिघे, अजित पंडित, किरण जोशी, धनंजय देशमुख, कु. कविता विधाते, संगीता गायकवाड, प्राचार्य रवींद्र चोभे यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment