नगर । प्रतिनिधी -
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत (युपीएससी) देशात 225 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला नगरचा सुपुत्र शेख मोहंमद जैब जाकीर (रा.पंचपीर चावडी) यांचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंचपीर चावडी येथे त्याचे आगमन होताच फुलांच्या वर्षावाने तर गळ्यात फुलांच्या माळा घालून तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. मोहंमद जैब वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचा आनंद व्यक्त करीत परिसरातील नागरिक, त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने त्याला शुभेच्छा दिल्या.
पंचपीर चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, उबेद शेख, इंजी. अनिस शेख, डॉ.रिजवान अहेमद, नगरसेवक आसिफ सुलतान, फारुक बागवान, हाजी मुस्ताक कुरेशी, रऊफ बागवान, वडिल जाकिर शेख, आजोबा रशीद शेख, अॅड.जावेद खान, नवाज शेख, अॅड.सादिक सय्यद, न्याज सय्यद, शब्बीर सय्यद, वसीम सय्यद, कासम केबलवाला आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
जैब यांचे वडिल जाकिर शेख यांनी आपल्या मुलांवर पालकांनी विश्वास ठेवावा. त्यांना अपयश आल्यास आपण प्रोत्साहन दिल्यास ते जीवनात आपले ध्येय गाठू शकणार असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात मोहंमद जैब यांनी आपल्या शहराचे नांव उंचावले आहे. तो मुस्लिम समाजातील युवकांसाठी रोलमॉडेल ठरला असल्याची भावना व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले. मिराकी ऑर्गनायझेशनच्या वतीने एमपीएससी व युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेत प्रथम आलेल्या सिमरन तन्वीर शेख व अय्याज खान यांना प्रत्येकी 5 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले.
मोहंमद जैब यांत्रिकी (मेकॅनिकल) शाखेत बी.टेक झाला आहे. ही पदवी घेतल्यानंतर मुंबईत गोदरेज कंपनीत महिनाभर त्याने नोकरी केली. मात्र सनदी अधिकारी हेच त्याचे ध्येय होते. सन 2016 मध्ये त्याने या नोकरीचा राजीनामा देऊन युपीएससीची तयारी सुरु केली. सन 2017 मध्ये प्राथमिक व अंतिम अशा दोन्ही लेखी परीक्षा तो उत्तीर्ण झाला. तोंडी परीक्षेत अपयश आले असता खचून न जाता पुन्हा जोरदार तयारी करुन त्याने अंतिमत: आपले ध्येय गाठले. त्याने मुंबई येथील व्ही.जे.टी.आय. येथे बी.टेकची पदवी घेतली आहे. तर त्याचे 10 वी पर्यंन्तचे शिक्षण नगरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे. मोहंमद जैब याचे वडिल जाकिर शेख नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत. आई रुबीना या गृहिणी असून यांचे प्रोत्साहन त्याला लाभले. मोहंमद याची मोठी बहीण जोया शेख (एमबीए), लहान बहीण अफिया शेख (बीएस्सी), आजोबा रशिद शेख (सेवानिवृत्त अधिकारी, रेल्वे), मामा शोएब शेख (सेवानिवृत्त अभियंता बांधकाम विभाग), शासकीय ठेकेदार शकील शेख यांच्यासह नातेवाईकांचे मोहंमदला या यशात मोलाची साथ लाभली.
No comments:
Post a Comment