Tuesday, 16 April 2019

शरद पवारांच्या प्रत्युत्तराकडे लक्ष


नगर । प्रतिनिधी  -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज  (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता मार्केट यार्डसमोरील मोकळ्या मैदानात सभा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला ते काय प्रत्युत्तर देणार याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये मागील आठवड्यात झालेल्या सभेतही त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज शरद पवार यांची नगरला सभा होत आहे. पवार यांची यापूर्वी या मतदारसंघातील शेवगाव येथे सभा झाली होती. त्यानंतर नगरची ही पहिलीच सभा असून, या सभेत ते मोदींच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, नगर दक्षिण मतदारसंघाची जागा शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली असून, स्वतः यात लक्ष घातले आहे. आपले राजकीय प्रतिस्पर्धी दिवंगत बाळासाहेब विखे यांचे नातू असलेल्या डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास पवारांनी नकार दर्शविला. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशासही पद्धतशीर विरोध करून अखेर राष्ट्रवादीकडेच हा मतदारसंघ ठेवला. उमेदवार म्हणून इतर दोन-तीन नावांची चर्चा असताना ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या नावाला पसंती दर्शवून पवारांनी विखेंविरोधात तोलामोलाचा तरुण उमेदवारही दिला. या पार्श्वभूमीवर नगरच्या लढतीकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागलेले आहे.
शहरात मागील आठवड्यात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी पवार यांच्यावर सडकून टीका करून पक्षाच्या ‘राष्ट्रवादी’ या नावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला पवार नगरच्या सभेत चोख प्रत्युत्तर देतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment