नगर । प्रतिनिधी -
केडगाव येथील अग्निशमन उपकेंद्राच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्युत पुरवठा करणार्या रोहित्राला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. रोहित्राच्या चारही बाजूने आग धुमसत होती. अग्निशमन विभागाला संपर्क केला असता अर्धा तास उशिराने अग्नीशमन पथकाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तर केडगावच्या अग्निशमन उपकेंद्राला टाळे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आग लागलेल्या रोहित्राच्या जवळ जिल्हा परिषदेची शाळा व लोकवस्ती आहे. या रस्त्यावरुन शालेय विद्यार्थी व नागरिक रहदारी करीत होते. सकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात गोंधळ निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी अग्निशमन विभागाला संपर्क करुन तातडीने अग्नीशमन दलाचा बंब पाठविण्याची मागणी केली. अग्नीशमन दलाचे बंब लवकर आले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांना कोणतीही झळ बसली नाही.
मोठ्या थाटात केडगाव येथे अग्निशमन उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी अग्निशमन केंद्राची गाडी व महानगरपालिकेचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने कार्यालयास टाळे होते. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यास मनपा प्रशासन कुचकामी ठरत आहे. यासंबंधी मनपाच्या वरिष्ठांशी चर्चा केली असता सदर ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्यामुळे या उपकेंद्रांमध्ये गाडी उभी ठेवता येत नसल्याचे सांगण्यात आले. अशा घटना पुन्हा घडल्यास तातडीने केडगाव भागात आग विझविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हेतूने उपकेंद्रांमध्ये गाडी व पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वैभव कदम यांनी दिली.
No comments:
Post a Comment