नगर । प्रतिनिधी -
तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शहरात पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचतीसाठी प्रबोधन केले. तर मुलगी वाचवा... मुलगी शिकवाचा संदेश दिला. शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील माळीवाडा, जुने बसस्थानक, आनंदधाम आदी परिसरात या जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शहरासह जिल्ह्यात काही वर्षापासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. सतत दुष्काळी परिस्थिती उद्भत असल्याने पाण्याच्या संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यातील जलसंकटापासून वाचण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाणी वाचविण्याचा संदेश दिला. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन शाळेच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी दशकपूर्ती सोहळा जनजागृतीने साजरा करण्याचे ठरविले. तसेच महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून देखील स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. महिलांना समाजात व कुटुंबात देखील दुय्यम दर्जा दिला जातो. तर मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार चालू आहेत. हे समाजातील प्रश्न प्रबोधनाने सोडविता येणार असल्याची भावना प्राचार्या मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
शाळेत नवीन प्रवेश घेणार्या मुलींना मोफत शालेय पुस्तक संच, 10 वी व 12 वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस अडीच हजार रु. तर विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयात प्रथम येणार्या विद्यार्थिनीस दोन हजार शंभर रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या मेहेत्रे यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment