नगर । प्रतिनिधी -
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी केलेल्या पाहणीवरून असे निदर्शनास आले आहे की ग्रामीण भागातील तरुण वर्ग नोकरी, व्यवसायानिमित्ताने शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग ओस पडत आहे. शहरी भागातही नोकरी व्यवसाय न मिळाल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2019-20 या काळामध्ये नगर जिल्ह्यात 24 प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असून, त्या अंतर्गत 600 प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्धतेसाठीचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीपकुमार सिन्हा यांनी दिली.
ग्रामीण बेरोजगार तरुण वर्गाला दारिद्र्यरेषेचे कार्डधारकांना त्यांच्या अवगत असलेल्या कलागुणांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित करून ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि बँकेच्या माध्यमातून कर्जरूपी अर्थसाह्य व अनुदान मिळून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण (आरएसईटीआय)ला जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने स्थापन केलेले आहेत.
त्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र नाबार्ड यांनी संचलित अहमदनगर येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापना 2011 मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी 80% प्रशिक्षणार्थी यांना शासकीय योजनेचे अनुदान व बँकेकडून कर्जरूपी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तरुण वर्गामध्ये स्वयंरोजगारासंबंधी जागृती निर्माण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेमार्फत अहमदनगर अथवा तालुका या ठिकाणी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना दुपारचे जेवण व प्रशिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत दिला जाईल. सदर प्रशिक्षण 6 ते 30 दिवसाचे असणार असून, यामध्ये शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढीपालन, ड्रेस डिझायनिंग महिला-पुरुष, मसाला पदार्थ निर्मिती, मेणबत्ती, अगरबत्ती निर्मिती, बेकरी आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
No comments:
Post a Comment