नगर । प्रतिनिधी -
रसिक ग्रुपच्या वतीने दिले जाणारे रसिक गौरव कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार प्रा. मधुसूदन बोपर्डीकर, रसिक गौरव पुरस्कार डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे, रसिक समाज गौरव पुरस्कार उद्योजक, अभिनेते बलभीम पठारे व रसिक गौरव तरुणाई पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सल्लागार सचिन इटकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
शनिवार दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रोफेसर कॉलनी, सावेडी येथील जॉगिंग पार्क मैदानावर झालेल्या गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव म्हणजेच ‘रसिकोत्सव 2019’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
यावेळी ‘आय लव्ह नगर’चे नरेंद्र फिरोदिया, कोहिनूरचे प्रदीप गांधी, पारस पाईप्स अँड फिटिंगचे पेमराज बोथरा, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, मनपा उपायुक्त प्रदीप पठारे, मेहेर लहारे व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ संगीतकार प्रा. मधुसूदन बोपर्डीकर यांचे नगरच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कालिदास व अन्य 50 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे 65 ग्रंथ, 2 सीडीज प्रकाशित आहेत. नियतकालिकांचे संपादन, संगीताचे अध्यापन, संवादिनीचे कार्यक्रम, थोर कलावंत व संगीत नाटकांना साथ, पु. ल. देशपांडे यांचे 25 हून अधिक संगीत कार्यक्रम, आकाशवाणी व दूरदर्शनवरून सांगीतिक व भाषणाचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सौ. सुचेता धामणे यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक अनाथ, निराधार, मतिमंद, बेघरांना आश्रय देऊन सन्मानाने जीवन जगायला शिकवले.
बलभीम पठारे यांनी उद्योग, अभिनय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अक्षर करंडकसारखी राज्यपातळीवरील एकांकिका स्पर्धेचे आयोजन असो की माऊली सेवा प्रतिष्ठानच्या इंद्रधनू प्रकल्पाला जमीन दान करून आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले. अक्षर फिल्म्सच्या माध्यमातून त्यांनी ‘नीळकंठ मास्तर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सचिन इटकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सल्लागार असून पिंपरी चिंचवड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व पुणे येथे झालेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा डंका साता समुद्रापार पोहचविण्याचे काम केले आहे.
No comments:
Post a Comment