नगर । प्रतिनिधी -
जिद्द, चिकाटी, सराव व प्रयत्नात सातत्य असेल तर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन लार्सन अँड टुर्बो कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांनी केले.
मंथन वेलफेअर फौंडेशन व साप्ताहिक ज्ञानवंतच्या वतीने माऊली संकुल सभागृहात आयोजित मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यूपीएससी रँकर आयपीएस जैब शेख, उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप गाडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर, ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेते मोहिनीराज गटणे, सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पारगावकर म्हणाले, मंथन वेलफेअर फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करीत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
जैब शेख म्हणाले की, पालकांनी आता विद्यार्थ्यांना ससा आणि कासवाची जुनी गोष्ट सांगणे बंद केले पाहिजे. कारण सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सतत सतर्क व कार्यरत राहणे गरजेचे आहे.
डॉ. संदीप गाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकावा. व मोठ्या हिंमतीने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. अभिनेत्री तेजा देवकर म्हणाल्या की, प्रत्येक मुलांमध्ये काही सुप्त गुण असतात. पालकांनी ते हेरले पाहिजेत व त्या गुणांना वाव दिला पाहिजे. प्रत्येक मुलाला परीक्षेत चांगलेच गुण मिळतील व प्रत्येक जण डॉक्टर, इंजिनिअर होणार नाहीत. मात्र मुलांना ज्या क्षेत्रात गती आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी मुलांचे बालपण जपावे, त्यांना खेळू द्यावे, बागडू द्यावे, मित्र-मैत्रिणीमध्ये मिसळू द्यावे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून अभ्यासही करून घ्यावा.
यावेळी प्रशांत मोरे यांनी ‘हंबरुनी वासराला’, ’मला शाळेला पाठवायची माझी माय’, ’ऐका ऐका दोस्तांनो मायबापाची कहाणी’ अशा लोकप्रिय कविता सादर केल्या. अभिनेते मोहिनीराज गटणे म्हणाले की, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची रंगीत तालीम आहे. मंथन वेलफेअर फौंडेशनने या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कानाकोपर्यातील विद्वत्तेला वाव दिला. तुम्हाला मिळणारी पारितोषिके म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.
यावेळी मंथन वेलफेअर फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सचिन नरसाळे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. किशोर गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील 250 हून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment