नगर । प्रतिनिधी -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.12) नगर शहरात येत आहेत. सावेडी उपनगर परिसरात त्यांची जाहीर सभा होणार असून, सभास्थळासह शहरात ठिकठिकाणी तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयासह दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणांचे वरीष्ठ अधिकारी नगर शहरात दाखल झाले असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे नगर शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना 2014 साली खा. दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त होता. मात्र, आता ते पंतप्रधान असल्यामुळे मागीलवेळी पेक्षा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षकांसह पोलिस अधीक्षक, पाच अप्पर पोलिस अधीक्षक, 12 पोलिस उपअधीक्षक, 35 पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे 200 अधिकारी, कर्मचारी असा तब्बल एकूण दोन हजारांहून अधिक कर्मचार्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन आहे. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांतून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांसह अतिरिक्त फौजफाटा, बॉम्बशोधक पथके शहरात दाखल झाली आहेत. विशेष सुरक्षा विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, स्पेशल कमांडो बंदोबस्तासाठी आहेत.
No comments:
Post a Comment