Monday, 8 April 2019

प्रेमदान हडकोजवळील अनधिकृत बांधकाम हटविणार


नगर । प्रतिनिधी -
सावेडी येथील प्रेमदान हडकोच्या पश्चिमेस ले आऊट प्लॅनप्रमाणे मंजूर असलेल्या दक्षिण-उत्तर रस्त्यावर बेकायदेशीर व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करुन सदर रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. अ‍ॅड.कारभारी गवळी यांच्या तक्रारीवरुन सदरचे बांधकाम बेकायदेशीर ठरवीत 15 दिवसांत काढून घेण्याचे आदेश महापालिकेने नुकतेच दिले आहेत.
सावेडी सर्व्हे नं. 109 मध्ये वसंत गायकवाड या जमीन मालकाने सन 1992 मध्ये ले आऊट प्लॅन टाकून शेकडो प्लॉट्सला नगरपालिकेकडून मंजुरी मिळवली होती. 1992 च्या ले आऊट प्लॅनप्रमाणे मंजूर असलेला 174 मीटर लांबीचा व 8 मीटर रुंदीचा प्रेमदान हडकोच्या पश्चिमेस शेजारी दक्षिण-उत्तर असलेला रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून नागरिक उपयोग करीत होते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये किरण गायकवाड यांनी या सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम करुन व्यावसायिक गाळे काढले. यामुळे पलीकडील भागातील नागरिकांना रहदारीचा रस्ता बंद झाल्याची तक्रार अ‍ॅड.गवळी यांनी केली होती. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महापालिकेकडे पाठपुरावा केला.
या जागेची समक्ष पाहणी केली असता महापालिकेची परवानगी न घेता प्रेमदान हडकोच्या संरक्षक भिंतीपासून मंजूर रेखांकनातील 8 मी. रुंद रस्त्यासह इतर जागेत साडेदहा मीटर लांब व साडे दहा मीटर रुंद या क्षेत्रफळाचे लांबीचे बांधकाम केले असल्याचे नगररचनाकार यांनी अभिप्राय दिला. सदरचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सिध्द करीत, सदरील बांधकाम नियमित करुन घेण्यास अथवा हटविण्यास पुरेशी संधी देण्यात आली होती. परंतु विनापरवाना बांधकाम न थांबविता ते पूर्ण करुन त्याचा व्यावसायिक वापर सुरु केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
याप्रकरणी सुनावणी होऊन बांधकाम परवानगी घेतल्याचे किंवा अनधिकृत बांधकाम पाडल्याचे कोणतेही कागदपत्र गायकवाड यांना सादर करता आले नाही. पुनश्च मुदत न देता सदर अनधिकृत बांधकाम 15 दिवसाच्या आत काढून घेण्याचे आदेश महापालिकेने उपायुक्तांच्या स्वाक्षरीने दि.1 एप्रिल रोजी दिले आहेत.
पूर्वेच्या बाजूला चारशे ते पाचशे घरकुले असून दोन हजारपेक्षा जास्त नागरिक येथे वास्तव्यास आहेत. अनधिकृत बांधकामाने बंद झालेल्या रस्त्यामुळे सदर भागात आग लागल्यास किंवा एखाद्या नागरिकाची तब्येत खालावल्यास या भागात आगीचा बंब व रुग्णवाहिका येणे अशक्य झाले आहे. तसेच रस्ता बंद असल्याने कचरा जमा करणार्‍या घंटागाड्या येणे देखील बंद झाले आहे.
नागरिकांना पर्यायाने वळसा घालून दुसर्‍या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. येथे सर्वसामान्य नागरिक राहत असल्याने भीतीपोटी यासंबंधी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने स्वत: तक्रार करुन हे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. गवळी यांनी दिली.

No comments:

Post a Comment