पारनेर । प्रतिनिधी -
साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलेल्या एफआरपीच्या संरक्षणाप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकर्यांच्या बाबतीतही सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, जवळे, वाडेगव्हाण येथे महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांचा लाभ आज देशातील शेतकर्यांना होत आहे. यावर्षी 50 हजार मेट्रीक टन कांदा ‘नाफेड’ने खरेदी करुन शेतकर्यांना दिलासा दिला. पण कांदा उत्पादक शेतकर्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची ही निवडणूक आपल्या मतदारसंघात विचारांवर आधारित आहे. शेतकरी, पाणी, रोजगार या प्रश्नांवर मी माझी भूमिका प्रचारात सुरुवातीपासून मांडली. यासाठी विचारांचा वारसा लागतो, प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. समोरचे उमेदवार केवळ व्यक्तिद्वेषातून प्रचार करुन वेळ मारून नेत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. या मतदारसंघासाठी ते काय करणार हेही ते सांगू शकत नाहीत. प्रश्नांसाठी त्यांना जनतेने संधी दिली होती, पण जनतेचे कोणतेही प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते बोलूही शकले नाहीत, असा टोला विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment