नगर । प्रतिनिधी -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन नगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (37, खंडोबा वस्ती, जामखेड) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
शर्मा हा तेरावर्षीय पीडित मुलीच्या घरी 20 जानेवारी 2018 रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (ता. पाटोदा, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा 30 जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा यास अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 चे कलम 5 व भादंविक 376 अन्वये दोषी धरुन शर्माला 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच भादंविक 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment