नगर । प्रतिनिधी -
नगर दक्षिणचा आवाज दिल्ली दरबारी पोहचवून या ऐतिहासिक नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून भरीव स्वरूपाचा निधी मिळवून आणू आणि शहराच्या विकासाला चालना देताना शहर लवकरच महानगर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही आ. संग्राम जगताप यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या नगर शहरातील प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि.13) सकाळी शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करून करण्यात आला. यावेळी आ. जगताप यांनी माळीवाडा परिसरात प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला.
श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर विशाल गणेश मंदिरात नारळ फोडून व आरती करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या वेळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी उपमहापौर दीपक सूळ, प्रा. माणिकराव विधाते, संजय घुले, विजय गव्हाळे, ज्ञानेश्वर रासकर, दत्ता खैरे, सोमनाथ धूत, बाळासाहेब भुजबळ, किसनराव लोटके, प्रा. अरविंद शिंदे, विष्णू म्हस्के, कुमार नवले, अण्णा दिघे, महिला आघाडीच्या निर्मला मालपाणी, रेश्मा आठरे, रेखा जरे, शारदा लगड, सुरेखा कडूस, अंजली आव्हाड, अर्चना देवळालीकर यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरातील जनतेने मला दोन वेळा महापौरपदाची संधी दिली. त्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून शहराचा आमदार म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. गेल्या चार वर्षांपासून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. खासदारकीची संधी मिळाल्यास आपण केंद्राकडून भरीव निधी आणून विकास करू.
प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर माळीवाडा परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली.ठिकठिकाणी आ. जगताप यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment