Monday, 22 April 2019

प्रचार समाप्तीनंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना जाहीर प्रचारास मनाई


नगर । प्रतिनिधी -
लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार असून त्यासाठीचा जाहीर प्रचार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांस जाहीर प्रचारास तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. चलचित्र, बल्क एसएमएस,  दूरचित्रवाणी किंवा अन्य तत्सम साधनांच्या साह्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.  याशिवाय, वृत्तपत्रात दिनांक 22 व 23 एप्रिल रोजी द्यावयाच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घ्याव्या लागणार आहेत. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
दिनांक 10 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली. अर्ज माघारीच्या दिवसानंतर अहमदनगर मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात राहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारांच्या जाहीर प्रचारास सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्फत उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराकडे प्रशासन लक्ष ठेवून होते. दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. मात्र, उमेदवार वैयक्तिकरित्या प्रचार करु शकतील. परंतु पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव असेल.
 मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मीटर दूर पोलींग बूथ लावावा लागणार आहे. याशिवाय, याठिकाणी त्यांना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवता येणार आहेत.  निवडणूक आयोगाच्या या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment