नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रशक्ती संघटना पुणे आणि राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटी आयोजित पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींचा महामेळावा नुकताच नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आला. मेळाव्यात गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम काकडे, राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर, सचिव शहाजी अडसूळ, वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, सचिव मुकुंदराव मोरे, आयोजक देवराम कार्ले व पॅन कार्ड क्लबचे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीताराम काकडे म्हणाले, या सरकारने रोजगार निर्माण तर केला नाही उलट चांगल्या सुरू असणार्या संस्था बंद करून बेरोजगारी वाढवली आहे. शेतकरी देशोधडीला लावला आहे. युवक दिशाहीन केला आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून अराजकता माजवली आहे. लोकशाहीला या सरकारचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पॅन कार्ड गुंतवणूकदारांमध्ये एकूण 55 लाख लोकांची फसवणूक झाली आहे. त्या 55 लाख लोकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी ठामपणे उभी राहणार असून त्यांना न्याय देण्याचा काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असल्यामुळे यात अनेक तरुणवर्ग गुंतला आहे. समाजानेही त्यांच्याकडे एक समंजस भावनेने पहावे.
माणिकराव विधाते यांनी पॅन कार्ड धारकांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन आपला खासदार संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे. या सरकारने बेरोजगारांची मोठी फसवणूक केली आहे. त्याचे उत्तर देण्याची हीच वेळ असल्याचे सांगत पाठिंब्याबद्दल पॅन कार्ड क्लब बाधितांचे आभार मानले.
कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment