Thursday, 11 April 2019

भूमि अभिलेखचे रेकॉर्ड लवकरच मोबाईलवर पहायला मिळेल ः विष्णू शिंदे


नगर । प्रतिनिधी -
ब्रिटीश सरकारच्या कालखंडापासून भूमि अभिलेख हा सर्वात जुना व महत्त्वाचा विभाग आहे. भूमि अभिलेखाचे व नगर भूमापनाचे महत्व हे कालानुरुप वाढत चालले आहे. झपाट्याने वाढणारे शहरीकरण व यांत्रिकीकरणामुळे नापीक व वर्षानुवर्षे पडीक जमीन लागवडीखाली आल्याने बांधाचे व हद्दीचे वाद, भाऊहिश्शाचे वाद उपस्थित होतात. ते वाद भूमि अभिलेख विभाग उत्तमपणे उपलब्ध अभिलेखाच्या आधारे निवारण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, एमआयडीसी, विमानतळ, बाह्यवळण रस्ता, रेल्वे मार्ग इत्यादीसाठी अथवा अन्य प्रयोजनासाठी लागणारी जमीन मोजून अभिलेख दुरुस्त करणे व क्षेत्र निश्चिती असे महत्वाचे काम या विभागामार्फत केले जाते. येत्या काही दिवसात जनतेला आपल्या मोबाईलवर सर्व रेकॉर्ड बघायला मिळेल, यात शंका नाही. आता जुन्या भूमि अभिलेख विभागाने पूर्णपणे कात टाकली असून, नवीन अद्यावत भूमि अभिलेख विभाग आता जनतेला पहावयास मिळणार असल्याचे प्रतिपादन भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक विष्णू शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त नगरच्या भूमापन कार्यालय येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक विष्णू शिंदे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी भूमापन अधिकारी शरद काळे, प्रदीप गायकवाड, श्रीमती मनियार, भाऊसाहेब वाबळे, अनिल गिते, वैकर, गरदास, सोमवंशी, वाघमोडे, श्रीमती पुंड, पतंगे, मेरगु आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भूमापन अधिकारी शरद काळे म्हणाले, 10 एप्रिल हा राष्ट्रीय भूमि अभिलेख दिवस म्हणून जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे श्री. चोकलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे सर्व गावाचे गावठाण मोजणी काम उच्च तंत्रज्ञानाने म्हणजे ड्रोन सर्व्हेमार्फत केले जाणार आहे. या कामी प्रायोगिक तत्वावर नगर जिल्ह्यातील 10 गावांची निवड केली गेली आहे. तसेच भूमि अभिलेख विभागाचे सर्व अभिलेख स्कॅनिंगचे कामकाज पूर्ण झाले आहे. नगर भूमापनाचे सर्व मिळकतींचे रिस्ट्रक्चरींगचे काम प्रगतिपथावर आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी लावण्यात आलेल्या नगर भूमापनाचे अभिलेख प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जुनी मोजणी पद्धती, विविध भागांचे नकाशे, दस्तावेज नागरिक कुतूहालाने पाहत होते. सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी केले तर आभार अनिल गिते यांनी मानले.

No comments:

Post a Comment