Thursday, 18 April 2019

नगर दक्षिणमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोमात


नगर । प्रतिनिधी -
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून  19 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यांनी  निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु केल्याने गल्लो गल्ली व वाड्या वस्त्यावर नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. विविध पक्षांच्या  अनेक दिग्गजांच्या सभा थेट तालुकास्तरावर होत असल्याने या निवडणुकीची रंगत अधिकच वाढत चालली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
नगर लोकसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आता निवडणूक विभागाची जबाबदारी वाढली आहे. एका मतदान यंत्रावर केवळ 15 उमेदवार आणि एक नोटा अशा 16 चिन्हांसाठी जागा असल्याने आता नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे ठेवावी लागणार आहेत.
सध्या प्रचार वैयक्तीक पातळीवर येवून ठेपला आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विशेषतः बळीराजाच्या हाताला काम नसल्याने तेही प्रचाराच्या रणधुमाळीत सामिल झालेले दिसत आहेत. ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणार्‍या जाहीर सभांना असणारी उपस्थिती हे त्याचे द्योतक आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचार जोमात सुरु आहे. भर उन्हात प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यासोबतच शेवटच्या टप्प्यातील राजकीय खेळी खेळण्यास सुरवात झाली आहे. नात्यागोत्याच्या राजकारणाने नगर दक्षिण व नगर उत्तर लोकसभा मतदारसंघात नेहमीच ठसा उमटविला आहे.  या निवडणुकीत दोन्हीही मतदार संघांत पक्षापेक्षा उमेदवाराचे नात्यागोत्याचे संबंध प्रभावी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकारणातील मुरब्बी नेतेही जातीपातीचे व नात्यागोत्याचे राजकारण करण्यावर लक्ष केेंद्रीत करु लागल्याने राजकीय अंदाज बांधणे कठीण झाले आहे. आता तर बड्या नेत्यांनी नात्यागोत्याच्या राजकारणात नवीन चेहरे आणून नवीन नवीन क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आता कोण कोणाचा प्रचार करेल, हे सांगणे कठीण झाले आहे. मतदानासाठी आता अवघे 5 दिवस उरले असल्याने राजकीय खेळ्यांना ऊत आला असून कोण कोणाला तारणार आणि कोण कोलदांडा घालणार हे लवकरच समोर येणार आहे.

No comments:

Post a Comment