Thursday, 18 April 2019

भगवान महावीरांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला ः डॉ. शहा


नगर । प्रतिनिधी -
भगवान महावीरांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमीन खोदू नका, वृक्ष तोडू नका असा संदेश दिला. वनस्पती देखील सजीव आहेत हे भगवान महावीरांनी अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितले होते,असे प्रतिपादन द जैन फिलॉसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. बी. शहा यांनी केले.
संपूर्ण जगाला शांतता व अहिंसेचा संदेश देणारे 24 वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित इतिहास विभाग, गांधी महाविद्यालय व श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चानोदिया, सचिव हेमंत पोखरणा, कार्याध्यक्ष योगेश भंडारी, पोपटकाका भंडारी, प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, इतिहास विभागाचे प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी,  प्रा. नवनाथ विधाते, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतीलालजी कटारिया, डॉ.प्रमोद भळगट, डॉ.महेंद्र पटवा, संजय मेहेर, बाबूलाल भंडारी, सरपंच अनिल ढोबळे, शंकरराव देशमुख, डॉ.अनिल गर्जे, डॉ.योगेश रसाळ, डॉ. युनूस सय्यद, डॉ. जमीर सय्यद, प्रा.शिवराज पातळे, प्रा.किशोर चौधरी, शोभचंद ललवाणी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शहा म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत जैन समाजाने भगवान महावीरांच्या अहिंसेचे पालन करीत स्वातंत्र्यसंग्रामात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. आझाद हिंद सेनेत नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे एक खाजगी डॉक्टर खंडेलवाल हे भगवान महावीरांचे अनुयायी होते. कुमारी रमा जैन आणि तिची बहीण देखील आझाद हिंद सेनेत होत्या. तसेच सम्राट खारवेल याच्या शिलालेखावरून आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव मान्य करण्यात आले असेही त्यांनी सांगितले.
सकाळी 8 वाजता जैन समाज बंधू-भगिनींनी भव्य मिरवणूक काढली होती. व्याख्यानापूर्वी नवकार महिला स्वयंसहायता गटाच्या महिला व पाठशाळेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. प्रारंभी प्राचार्य नंदकुमार राठी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शांतीलाल शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. रतीलालजी कटारिया यांनी आभार मानले. या कार्यक्रमास परिसरातील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment