Tuesday, 16 April 2019

महात्मा फुलेंच्या कार्यातून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली ः पडवळे


नगर । प्रतिनिधी -
मानवी मूल्यांवर आणि समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. सामाजिक परिवर्तनाची खरी सुरुवात फुलेंच्या कार्यातून दिसून येते. गुलामगिरी, अन्याय, अत्याचार, चुकीच्या रुढी, परंपरा, अशिक्षितपणा, शेतकर्‍यांच्या समस्या या सर्वांची चिकित्सा करून यातून सोडवणुकीसाठी फुले दाम्पत्याने अथक परिश्रम घेतले. म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. त्यांच्या विचारातून आजच्या पिढीने बोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शेंडीचे सरपंच बाबासाहेब पडवळे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेंडी (ता. नगर) येथे डॉ. आंबेडकर फौंडेशन व शिवरुद्र बहुउद्देशीय संस्था आयोजित प्रबोधनपर व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवरुद्रचे अध्यक्ष डॉ. भगवान चौरे, शासनाचा आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड. महेश शिंदे, ‘रयत’चे पोपटराव बनकर, छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा रजनीताई ताठे, दत्तात्रय जाधव, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश शिंदे, संदीप लोंढे, मनीष कुरुंद, दिगंबर शिंदे, शशिकांत पडवळे, सुमित शिंदे, अक्षय पडवळे, योगेश शिंदे, भैरव पडवळे, संजय शिंदे, अर्जुन सुसे, बबन शिंदे, संकेत सुसे, संतोष सुसे, चंद्रकांत सुसे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री मोरे, श्रावणी मालुसरे, अंकिता राऊत, ओंकार कासार, वैष्णवी शिंदे यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर शाहिर वसंत डंबाळे, शाहिर दिलीप शिंदे, शाहिर दादू साळवे, गायिका संगीता गायकवाड यांच्या शाहिरी जलसाने शेंडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ तल्लीन झाली.
यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे यांनी, महात्मा फुले यांनी सर्व वंचित बहुजन व स्त्रिया यांच्या जीवनात बदल घडविला. युग परिवर्तन करून टाकणारी महान क्रांती केली. त्यांच्या महान क्रांतिकारी विचारांतून आज बदल झालेला आपल्याला दिसून येतो. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांनी बोध घेऊन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्यानात केले.

No comments:

Post a Comment