Saturday, 13 April 2019

मतदानाची लावा शाई, तरच टिकेल लोकशाही


नगर । प्रतिनिधी -
जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. परंतु लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा ‘डेमॉक्रसी’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. डिमॉस (ऊशोी) म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी (उीरलू) म्हणजे सत्ता असा आहे. मतदान करणे म्हणजे एक प्रकारे उत्सव आहे. आपण इतर उत्सव जशा पध्दतीने करतो त्याच पद्धतीने मतदान करुन लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा आहे.
आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशामध्ये  लोकशाही आहे का, हा प्रश्नच काहीजण करत असतात. परंतु लोकशाहीत आपण ज्यांना निवडून द्यावयाचे आहे त्यांना लोकशाही पध्दतीनेे निवडून देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो आहे. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. लोकशाहीत घराणेशाही  वेगवेगळ्या  मार्गांनी प्रवेश करते. उदा. काही वेळा लोकप्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक लोकप्रिय व्यक्तीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूचा’ व सहानूभूतीच्या लाटेचा फायदा घेत नेते होतात किंवा काही वेळा मोठा जनाधार असणार्‍या एखाद्या नेत्यास एखादे पद काही कारणांमुळे देणे शक्य नसल्यास, त्याची नाराजी टाळण्याकरिता ते पद त्याच्या जवळच्या नातेवाईकास देऊ केले जाते. आपल्यासारख्या विचारांच्या आवर्तनापेक्षा भावनांच्या लाटांवर स्वार होण्यास धन्यता मानणार्‍या तथाकथित सुशिक्षितांच्या देशात, जनतेच्या या भावनांचा धूर्त राजकीय मंडळी फार हुशारीने उपयोग करून घेतात. लोकही त्याला बळी पडून मृत्यू पावलेल्या त्या लोकप्रिय नेत्याच्या त्यानेच निवडलेल्या राजकीय वारसाची पोच, त्याची पात्रता, त्याचं आपल्या देशातील समस्यांचं आकलन याचा काही एक विचार न करता त्याला  निवडून   देतात. प्रत्येक वेळी जे आडात असतं, ते पोहर्‍यात असतंच असं नाही. सत्ता आणि त्यातून प्राप्त होणारे अमर्याद फायदे आपल्याच घरात कसे राहतील याचीच काळजी  घराणेशाही  घेत असते.
मात्र, अशा घराणेशाहीला टाच लावून लोकशाहीच्या दिशेने जाण्यासाठी आपण प्रयत्न करुन लोकशाहीसाठी जास्तीत जास्त मतदान करुन स्वच्छ व विकसनशील उमेदवार निवडून देणे गरजचे आहे. तरच लोकशाही खर्‍या अर्थाने टिकेल.

No comments:

Post a Comment