नगर । प्रतिनिधी -
अहिंसा परमो धर्म: या मंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्या भगवान महावीर स्वामींची 2618 वी जयंती (जन्मकल्याणक) बुधवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा काढण्यात आली. चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
सकाळी 7.30 वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, घोडेस्वार, उंटस्वार, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष, केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद)ची गाडीही होती.
या शोभायात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आ.संग्राम जगताप, कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, आनंदराम मुनोत, संतोष बोथरा, महावीर बडजाते, डॉ.प्रकाश कांकरिया, चंपालाल मुथा, संतोष गांधी, अशोक (बाबूशेठ) बोरा आदी सहभागी झाले होते.
ही शोभायात्रा कापडबाजार, अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृहमार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे पोहचली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. आनंद संस्कार शिक्षा अभियानच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. सिमंधर स्वामी भक्ती मंडळाने टिपरी नृत्य सादर केले. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. चौकाचौकात भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसादाचे वाटप करण्यात आले. महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्यावतीने मार्केटयार्डसमोर शीतपेयाचे वापट करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, सेके्रटरी सुवालाल ललवाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रखर वक्ता तरूणसागरजी महाराज यांचे गुरु आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज, प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज, पद्मऋषीजी महाराज, अलोकऋषीजी महाराज, विमलकंवरजी महाराज, किरणप्रभाजी महाराज, पुष्पकुंवरजी महाराज, डॉ.प्रियदर्शनाजी महाराज, सत्यप्रभाजी महाराज, दिव्यदर्शनाजी महाराज, सम्यकदर्शनाजी महाराज, विश्वदर्शनाजी महाराज, अर्चनाजी महाराज आदी साधूसाध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले.
यावेळी नेहा ओस्तवाल, समृध्दी शेटिया, दिया मुथा, निहारिका बडजाते या मुलींनी भक्तीगीते तसेच कविता सादर केल्या. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी स्वागत केले. श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, महावीर बडजाते, संतोष गांधी, सविता फिरोदिया आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. राजभवनाबाहेर पडत त्यांनी साडेबारा वर्षांची कठोर साधना केली. यातून ते केवलज्ञानी झाले. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
आदर्शऋषीजी महाराज म्हणाले, जो रात्री प्रकाश देतो त्याला दिवा म्हणतात, जो दिवसा प्रकाश देते त्याला सूर्य म्हणतात. मात्र जे हजारो वर्षांपासून समस्त मानवजातीला विचारांचा प्रकाश देत आहेत, त्यांना भगवान महावीर म्हणतात. आज 2600 वर्षानंतरही महावीर स्वामींचे विचार मानवजातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते.
आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज म्हणाले, दुसर्यांना योग्य मार्ग दाखवून देत त्यांना तारणारे तीर्थंकर असतात. भगवान महावीर स्वामींनी सर्वांना सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा या पाच व्रतांचे पालन करण्याचा संदेश दिला. त्यांनी बारा वर्षाच्या तपस्यासाधनेत फक्त एक वर्ष आहार घेतला. बाकी अकरा वर्षे उपवास केला. त्याचबरोबर साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली. यामुळे त्यांना तीर्थंकर म्हटले जाते. आजचे जग व्यावहारिक झाले आहे. अशांतता, भौतिकवाद वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे प्रत्येक मनुष्याचे ध्येय व कर्तव्य आहे. आज त्यांचा जयंती सोहळा साजरा करताना आपण मनापासून येथे आहोत का याचे आत्मचिंतन करा, असे आवाहन आचार्य पुष्पदंत सागरजी यांनी केले.
रांगोळी स्पर्धेचा निकाल असा - प्रथम क्रमांक (विभागून)- मिनल पारख, राखी गांधी, प्रिती पोखरणा आणि तपस्या व साक्षी कांकरिया, व्दितीय क्रमांक (विभागून)- पूजा चंगेडिया आणि प्रेक्षा व दर्शना नहार, तृतीय क्रमांक (विभागून)- सोनाली बोरा आणि अखिल भंडारी. उत्तेजनार्थ- शामली व प्रतीक्षा गुगळे, नयना व प्रिया गांधी, स्वीटी व तृप्ती मुथा. लहान मुलांसाठी विशेष पुरस्कार- मीत व मन चंगेडिया. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण सरोज कटारिया व शैला गांधी यांनी केले. बक्षीस वाचन सुभाष मुथा यांनी केले. शहरात बहुतेक ठिकाणी महावीर जयंतीनिमित्त चौकांची विशेष सजावट करण्यात आली होती.