Tuesday, 26 March 2019

महापालिकेत कर्मचार्‍यांचा संप सुरु


नगर । प्रतिनिधी-
महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात आऊटसोर्सिंगद्वारे विविध कर्मचार्‍यांच्या भरतीला विरोध करत कर्मचारी युनियनने दिलेल्या संपाच्या नोटिसीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून (दि.26) मनपाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी महापालिकेत कर्मचार्‍यांची बैठक घेऊन आंदोलनाचा सुरूवात केली आहे. दरम्यान, संपामुळे ऐन मार्च अखरेच्या पार्श्वभूमीवर कामकाज ठप्प झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
घनकचरा विभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर, संगणक ऑपरेटर व अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी मनपाने खासगी कंत्राटदाराकडून निविदा मागविलेली आहे. कर्मचारी युनियने याला आक्षेप घेत कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्तीने ही पदे भरण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात युनियनने नोटीस बजावून 26 मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. युनियनशी साधी चर्चाही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविलेली नाही. त्यामुळे नोटिसीप्रमाणे संप सुरू करण्यात आल्याचे लोखंडे यांनी सांगितले.कर्मचार्यांच्या कालबध्द पदोन्नत्तीच्या फरकाच्या रकमाही मनपाने दिलेल्या नाहीत. सुमारे पावणेदोन कोटी रुपये थकीत आहेत. मनपाने 10 लाख, 20 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. मात्र, सर्व रकमा तात्काळ मिळाव्यात, अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. याबाबतही आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता. प्रशासनाशी या विषयावर चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे आजपासून संप व आंदोलन सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment