नगर । प्रतिनिधी - माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत सतत तुलना सुरू असते. या तुलनात्मक स्पर्धेत आनंदाने जगण्यासाठी अहंकार नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:च्या आयुष्याचे मालन न बनता विश्वस्त व्हा, असा मोलाचा सल्ला प्रवचनकार संजय उपाध्ये यांनी दिला.
आचार्य आनंदऋषीजी महाराज महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त जैन सोशल फेडरेशनने आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या व्याख्यानमालेत उपाध्ये यांनी ‘तुलना करा आणि सुखात जगा’ या विषयावर पहिले पुष्प गुुंफले.
संजय उपाध्ये म्हणाले की, स्वकेंद्रित तुलना ही फायदेशीर असते तर आत्मकेंद्रित तुलना घातक ठरते. तुलना नकारात्मक असेल तरी तिचा सकारात्मक उपयोग करून घेता आला पाहिजे. उणीवेचाही उपयोग करून घेता येतो का हे महत्त्वाचे आहे. तुलना नावाच्या रोगाचे गुणात रुपांतर करायचे असेल तर त्यासाठी अहंकार नाहिसा होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वत:कडे तटस्थपणे बघता आले पाहिजे. परमेश्वराने मला विश्वस्त म्हणून या भूमीवर पाठवले आहे, या भावनेने आयुष्य जगा. म्हणजे तुम्ही स्वत:च्या आयुष्याचे मालक नव्हे विश्वस्त बनाल. आयुष्यात जसे यश मिळत जाते तसा तुलनेचा ओघ वाढत जातो. रिक्तावस्था नव्हे तर विरक्तावस्था हे मनुष्याच्या आयुष्याचे प्रयोजन आहे. माझ्यातील षडरिपूंचा मला पाहिजे तेव्हा उपयोग करता आला पाहिजे याला विरक्तावस्था म्हणतात. दैनंदिन आयुष्यात मनन, नमन आणि वमन करा. यामुळे प्रकृती उत्तम राहते.
गरजा कमी करत नेल्या की तुलनेचे स्वरुपही कमी होते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. सुखाने जगण्यासाठी अधोमुखी तुलना करा. दैनंदिन जीवनात एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलता यायला हवा. तुलना करीत आयुष्यात त्रस्त न होता विश्वस्ताच्या भूमिकेतून सारे काही सांभाळायचे आहे ही भावना म्हणजे अध्यात्म आहे. आनंदाचे जगणे हा आयुष्याचा अंतिम हेतू साध्य होण्यासाठी ही भावना महत्त्वाची ठरते.
प्रास्ताविक प्रसाद बेडेकर यांनी केले. उपाध्ये यांचा सत्कार शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. संतोष गांधी यांनी आभार मानले. या व्याख्यानाप्रसंगी फौंडेशनच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया, डॉ.शरद कोलते, सौ.वैशाली कोलते, हेमराज बोरा आदी उपस्थित होते. आनंदधाम येथे आयोजित या व्याख्यानमालेत दि.22 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रशांत देशमुख यांचे ‘चला जीवन समृध्द बनवूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
No comments:
Post a Comment