Friday, 1 March 2019

प्राप्तिकर विभागाच्या बदलामुळे करदात्यांना अनेक सुविधा ः जैन


नगर । प्रतिनिधी - पुरातन काळापासून प्राप्तीकर अस्तित्वात असून आजपर्यंत त्यात अनेक बदल झाले. आजच्या डिजिटल युगात कागदी कामकाज कमी झाले असून कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. त्यातच प्राप्तीकर विभागाने अनेक बदल केले असून आज करदात्यांना अनेक सुविधा व सेवा देण्याचे धोरण विभागाने स्वीकारले असल्याचे मत प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त पुणे विभाग श्री. आशु जैन यांनी व्यक्त केले.
सीए नगर शाखा व अहमदनगर प्राप्तीकर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीएभवन येथे आयोजित करसंवाद मेळाव्याचा शुभारंभ मुख्य प्रधान प्राप्तीकर आयुक्त आशु जैन पुणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रधान प्राप्तीकर आयुक्त श्रीमती एम.व्ही.भानुमथी, अतिरिक्त प्राप्तीकर आयुक्त मिलिंद चाहुरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत गांधले (नगर), करसल्लागार संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अशोक गांधी,सीए नगर शाखा अध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी, उपाध्यक्ष परेश बोरा, सचिव किरण भंडारी, खजिनदार सनित मुथा, प्रसाद भंडारी उपस्थित होते.
यावेळी जैन म्हणाले की, प्राप्तीकर हा देशाच्या विकासाचा मुख्य आधार असून देशाच्या व पर्यायाने स्वत:च्या प्रगतीसाठी योग्य कर भरणे हि नैतिक जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. आनंदाने कर भरणे व आनंदाने कर स्वीकारणे या नव्या धोरणाने प्राप्तीकर विभाग कार्य करत असून करदात्यावर पूर्ण विश्वास ठेवला जात आहे.एकून करदात्यांच्या 0.35 %  टक्के इतक्याच करदात्यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे, हे प्रमाण आता अजून कमी होईल.
संगणकीकरणामुळे  आता प्रत्येकाचा आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उपलब्ध असून एका क्लिकवर सर्व माहिती विभागाला उपलब्ध होते. पुणे विभागाने अत्यंत उत्तमरित्या संगणकीकरण केले असून देशात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. कर वसुलीतही देशात आपला विभाग आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वात पुढे असेल.
प्रधान प्राप्तीकर आयुक्त एम.व्ही.भानुमथी म्हणाल्या की, सहकाराचे माहेरघर व नवीन दिशा देणारा नगर जिल्हा आता प्राप्तीकर करदात्याचा नवे मॉडेल म्हणून ओळखला जावा. करदात्यांच्या सोयीसाठी ई सेवा उपलब्ध आहे, त्याचा अधिक वापर करावा, 15 मार्चपूर्वीच कर भरून सहकार्य करावे.
मिलिंद चाहुरे यांनी सांगितले की, या कार्यक्रमातून करदाते व आयकर विभाग यांच्यात चांगला संवाद निर्माण होईल. सीए व करसल्लागार यांना योग्य माहिती दिली तर अनेक अडचणी कमी होतील. कायद्यात अनेक बदल करून करदात्यांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.
अ‍ॅड.अशोक गांधी यांनी  सांगितले की, नगर प्राप्तीकर विभागाचे सर्व अधिकारी उत्तम सहकार्य करतात.आज करदातेही जागृत झाले आहेत.त्यांनाही याचे महत्व कळले असून आता योग्य कर भरण्याची जाणीव वाढत आहे.
प्रास्ताविकात नगर शाखा अध्यक्ष ज्ञानेश कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राप्तीकर विभाग, सीए, करसल्लागार व करदाते यांच्यात संवाद घडवून अनेक प्रश्न सुटावेत व नव्या दिशेने सर्वांनी एकत्रित विचार करून देशाच्या प्रगतीचे भागीदार व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित करदात्यांच्या शंकांचे समाधान उपस्थित मान्यवरांनी केले. सूत्रसंचालन सीए आयुषी झंवर हिने केले. आभार सहाय्यक आयकर आयुक्त प्रशांत गांधले यांनी मानले. कार्यक्रमास हस्तीमल मुनोत, नगर सीए शाखाचे माजी अध्यक्ष मोहन बरमेचा, संजय देशमुख, अजय मुथा, मिलिंद जांगडा, सीए सभासद, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment